वेणुनादाने रसिकांचे कान तृप्त करणारे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ बासरीवादक पद्मभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया वास्तविक पैलवान व्हायचे. पण रसिकांच्या सुदैवाने नियतीच्या मनात वेगळेच होते आणि अद्वितीय असा बासरीवादक घडला..
पैलवान न होता आपण बासरीवादक कसे झालो, त्याची आठवण दस्तुरखुद्द पं. चौरसिया यांनी शुक्रवारी मुंबईत उलगडली. निमित्त होते सेंट झेविअर्स महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेचे.
महाविद्यालयाच्या ‘इंडियन म्युझिक ग्रुप’तर्फे २५ आणि २६ जानेवारी रोजी ‘जॅनफेस्ट’ या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेस पं. चौरसिया उपस्थित होते.
या वेळी आठवणींना उजाळा देताना पंडितजी म्हणाले की, माझे वडील पैलवान  होते. त्यामुळे मीसुद्धा पैलवान   व्हावे, असे माझ्या वडिलांना वाटायचे. पण माझ्या आईमुळे मी बासरीवादक झालो.
भावुक झालेल्या पं. चौरसिया यांनी सांगितले की, लहानपणी आई मला जेवण भरविताना गाणी गुणगुणायची, मला ‘लोरी’ म्हणवत झोपवायची. आईचे ते शब्द आणि सूर माझ्या मनात-डोक्यात कायम गुणगुणत राहिले. आईने माझे नावही ‘हरी’ ठेवले होते. याच ‘हरी’च्या हातात आईने बासरी दिली व मी पैलवान न होता बासरीवादक झालो.