मुंबई : कितीही अडथळे आणि संकटे येऊ देत, महाराष्ट्राची घोडदौड सुरूच राहील. महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचे आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कुटिल कारस्थान जर कुणी करीत असेल तर येथील स्वाभिमानी जनता त्यांना उत्तर देण्यास समर्थ आहे. स्वार्थ आणि महत्त्वाकांक्षेपोटी महाराष्ट्रामधील जाती- धर्मातील सलोखा संपवण्याचे काम सुरू असल्याची टीका विरोधकांवर करत राज्यातील सौहार्द, सामंजस्याचे वातावरण बिघडू देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त केले आहे.

 महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतरचा हा तिसरा महाराष्ट्र दिन आहे. दोन वर्षे तर देशावरच करोना विषाणूचे संकट होते, पण याही आव्हानात्मक परिस्थितीत शेती, उद्योग – गुंतवणूक यामध्ये महाराष्ट्राने स्वत:ला आघाडीवर ठेवले. शिवभोजनसारखी थाळी मोफत देऊन, तसेच दुर्बल, असंघटित वर्गाला आर्थिक साहाय्य करून सामाजिक भान ठेवले आणि महाराष्ट्राची परंपरा कायम ठेवली.