मुंबई : कुटुंबाची बेताची आर्थिक परिस्थिती, वडिलांच्या पाणीपुरीच्या व्यवसायातून मिळणारे तुटपूंजे उत्पन्न, त्यातच प्रकृती अस्वस्थ्यामुळे इयत्ता अकरावीत आलेल्या अपयशामुळे खचून न जाता कल्याणमधील हर्ष गुप्ताने (१९) कठोर मेहनत घेतली. अकरावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने बारावीमध्ये प्रवेश घेतला. दिवस-रात्र एक करून अभ्यास केला आणि बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर जेईई परीक्षेत यश संपादन केले. अखेर त्याने भारतीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये (आयआयटी) प्रवेश घेतला. हर्षची ही यशोगाथा सध्या कल्याण आणि आसपासच्या परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.
कुटुंबाची बेताची आर्थिक परिस्थिती असतानाही कठोर मेहनत आणि कुटुंबाच्या पाठिंब्याने हर्षने अभ्यासात यश संपादन केले. तब्येत बिघडल्याने हर्ष अकरावीत अनुत्तीर्ण झाला होता. त्यावेळी त्याच्या मित्रांनी त्याची चेष्टा केली आणि त्याचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न केला. पाणीपुरी विकणाऱ्याचा मुलगा आयआयटी कसा उत्तीर्ण होईल, अशी शंका अनेकांनी व्यक्त केली. मात्र, नकारात्मक विचारांवर मात करत त्याने अभ्यासात सातत्य ठेवले. अकरावीमध्ये नापास झाल्यानंतर हर्षने कोटा (राजस्थान) येथील एका कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतला. मित्रांकडून होणाऱ्या टीकेकडे लक्ष न देता दररोज १० ते १२ तास अभ्यास करून तो अकरावीत उत्तीर्ण झाला. बारावीत असतानाही त्याला आरोग्याच्या समस्येने ग्रासले. डॉक्टरांनी पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिल्याने तो वसतिगृहातून घरी परतला. बारावी आणि जेईई परीक्षेबाबत मार्गदर्शन करणारे मदतीला नसल्याने इतरांच्या तुलनेत त्याची परीक्षेची तयारी उशिरा सुरू झाली होती. मात्र, कठोर मेहनत घेऊन त्याने परीक्षा दिल्या. जेईई उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने उत्तराखंडातील आयआयटी रुडकी येथे प्रवेश घेतला. भविष्यात प्रशासकीय सेवेत रूजू होण्याचे त्याचे स्वप्न आहे. येत्या २५ जुलै रोजी तो पुढील शिक्षणासाठी आयआयटी रुडकी येथे दाखल होणार आहे. ही परीक्षा आयआयटीसह इतर नामांकित अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात येते.
आयुष्यात अनेक वेळा अपयशाचा सहन करावे लागते. अपयश तुमची पात्रता सिद्ध करत नाही. त्यामुळे कधीही हार मानू नका, असा सल्ला हर्शने अन्य विद्यार्थ्यांना दिला आहे. मी माझ्या कुटुंबातला आणि शाळेतला पहिला आयआयटी विद्यार्थी आहे. अकरावी नापास झाल्यानंतर अनेकांनी माझ्यावर टीका केली. माझ्या कौटुंबिक, आर्थिक परिस्थितीची चेष्टा केली. मात्र, कुटुंबाने आणि जिवलग मित्रांनी कायमच मला साथ दिली. माझी अकरावीपासून आयआयटीसाठी मुंबई किंवा रुडकी येथे जाण्याची इच्छा होती. ती आता पूर्ण झाली आहे. वडिलांनी मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करत उच्च शिक्षण दिले. त्यांचे आयुष्यात स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न आहे. आता त्यांच्या घराचे स्वप्न मला पूर्ण करायचे आहे, अशी भावना हर्षने व्यक्त केल्या. या खडतर प्रवासात वडिलांची खंबीर साथ त्याला मिळाली. ते कायमच त्याला अभ्यासासाठी प्रोत्साहन द्यायचे. ‘मी शिकू शकलो नाही, पण तू तुझे स्वप्न नक्की पूर्ण कर’, असे ते हर्षला नेहमी सांगायचे.
हर्षचा आदर्श घेत त्याच्या अन्य दोन भावांनीही उच्च शिक्षणाचा निर्णय घेतला आहे. त्याचा धाकटा भाऊ शिवमनेही जेईईची तयारी सुरू केली आहे. तर, शुभमने नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली असून भविष्यात कोणत्या क्षेत्रात जावे, याचा तो विचार करीत आहे.