मुंबई: केंद्र व राज्यातील भाजपचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभाराविरोधात तरुणांमध्ये प्रचंड असंतोष आहे. शिवाजी पार्कवरील आंदोलनात या असंतोषाला वाचा फोडण्याचे काम करण्यात आले आहे, परंतु मोदी सरकार विरोधातील हा असंतोष दडपण्यासाठी सरकारने त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. भाजपाने कितीही गुन्हे दाखल केले तरीही ही तरुण आता मागे हटणार नाही, हे भाजप सरकारने लक्षात ठेवावे, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सपकाळ यांनी भाजपवर टीका केली. देशाची लोकशाही व संविधान धोक्यात आहे, ती वाचवण्यासाठी तरुण रस्त्यावर उतरले. त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न हे देशासमोरील ज्वलंत प्रश्न आहेत. निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना जी पत्रे पाठविले आहेत, त्यावर ज्ञानेशकुमार का बोलत नाहीत, यावर भाजपने बोलावे, मुळ मुद्द्याला बगल देत नेहमीचेच हिंदु-मुस्लीम, भारत-पाकिस्तानचे तुणतुणे वाजवणे बंद करा. सरकार दडपशाही करून आवाज दडपण्याचा प्रयत्न करेल तर त्याची मोठी किंमत भाजपला सरकारलाच मोजावी लागेल, असेही सपकाळ म्हणाले.
शिवाजी पार्कवरील आंदोलनाबरोबरच नाशिकपासून मुंबईकडे आदिवासी विद्यार्थ्यांचा लॉंग मार्च निघाला आहे तर पुण्यात राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) विरोधात लाखो तरुण विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या तिन्ही घटना भाजप सरकारच्या गलथान कारभाराचे वाभोडे काढणाऱ्या आहेत. एमपीएससीच्या अध्यक्षांची हकालपट्टी करावी ही विद्यार्थ्यांची मागणी असताना मुख्यमंत्री मात्र हात झटकत आहेत, कारण या पदावरील अध्यक्ष भिमनवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्तक आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यासारखे वागावे, तो मी नव्हेच असा पवित्रा घेऊ नये असे सपकाळ म्हणाले.
साहिल वाकोडेच्या कुटुंबियांनी घेतली डॉ. प्रसाद व सपकाळांची भेट
जातीय छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडेच्या कुटुंबीयांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची शांता आश्रम येथे भेट घेऊन चर्चा केली. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, रेहाना चिश्ती, यु.बी. व्यंकटेश, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड, मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षा झीनत शबरीन, प्रदेश काँग्रेसच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आशुतोष शिर्के आदी उपस्थित होते.
