मुंबई: राज्य सरकारमधील महिलांचा आवाज किंवा महिलांची जबाबदारी असलेल्या खात्याच्या आदिती तटकरे मंत्री आहेत. मात्र मागील काही दिवसांमध्ये खरात प्रकरण असो, या खात्यांतर्गत येणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षांवर झालेले आरोप असो, भोंदूबाब ऋषिकेश वैद्य असो, नवी मुंबईतील आदर्श म्हात्रे प्रकरण असो; राज्यातील महिला भगिनींसोबत अत्याचार झाल्याच्या बातम्या, प्रकरणे समोर येत आहेत, पण राज्याच्या महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे बेपत्ता आहेत, त्यांना आपली जबाबदारी माहीत नसेल तर राजीनामे देऊन घरी बसावे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
राज्यात महिला अत्याचारांच्या घटना समोर येत असताना आदिती तटकरे यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया येत नसल्याबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली.
महिला अत्याचारांच्या सर्व घटनांवर काही एक प्रतिक्रिया आपण त्यांची ऐकलीय का? तसेच राज्यातील पिडीत महिलांना न्याय मिळेल, असा विश्वास देणारं ट्विट किंवा पोस्ट तरी त्यांनी केलीय का? किंवा या प्रकरणानंतर याबाबत त्यांच्या खात्याअंतर्गत यावर एखादी बैठक घेतली काय? याबाबत राज्यातील पोलीस महासंचालकांना त्या भेटल्यात का? असा सवाल करतानाच जर या मंत्री महोदयांना स्वतःची जबाबदारी काय आहे, हेच समजत नसेल, तर यांनी राजीनामे देऊन घरी बसावे आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यात वेळ घालवावा. उगाच मंत्रीपदाची खुर्ची उबवू नये, असा टोला त्यांनी लगावला.
सपकाळांच्या टीकेनंतर तटकरेंचे प्रत्युत्तर
हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेनंतर मंत्री अदिती तटकरे यांनी एक्सवर संदेश दिला. नाशिकच्या भोंदूबाबा खरात प्रकरणात चौकशीच्या दृष्टीने व न्यायाच्या दृष्टीने सरकार अगदी सुरुवातीपासूनच तत्पर आहे. राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तत्परतेने एसआयटी स्थापन करून, अशोक खरातला अटक करून कारवाईला गती दिली आहे. राज्यातील सक्षम महिला पोलिस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे या प्रकरणाच्या चौकशीचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. माननीय मुख्यमंत्री व संपूर्ण मंत्रिमंडळासोबत एक मंत्री व एक महिला म्हणून या प्रकरणाबाबत माझ्याही भावना अत्यंत तीव्र आहेत. या भावना मी वेगवेगळ्या प्रसंगी, वेगवेगळ्या व्यासपीठांवर ३-४ वेळा मांडल्या असल्याचे सांगताना त्यांनी टि्वटसोबत स्वत:च्या प्रतिक्रियांच्या लिंक्स सोबत जोडल्या. महिलांच्या सन्मानासाठी, सक्षमीकरणासाठी व न्यायासाठी महिला व बालविकास विभाग सदैव तत्पर आहे, सज्ज आहे. महिलांवर होणारा कोणताही अन्याय खपवून घेणार नाही या भूमिकेचा पुनरुच्चार करते, असेही तटकरे यांनी या एक्सवरील संदेशाद्वारे स्पष्ट केले.
