एके काळी मुंबईच्या गुन्हेगारी विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या डॉन हाजी मस्तानच्या मुलीने आता तिची आपबिती सांगितली आहे. १२ वर्षांची असताना तिच्यावर बलात्कार झाला. तिची आई जिवंत असून आईला गायब करण्यात आलं. मला आता न्याय हवा आहे असं हसीन मस्तानने म्हटलं आहे. या संदर्भात तिने थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. हसीन मस्तानने काय काय म्हटलं आहे आपण जाणून घेऊ.

काय म्हटलं आहे हसीन मस्तानने?

“मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. त्यांना मी हात जोडून हीच विनंती केली आहे की आपल्या देशातले कायदे आणखी कठोर करा. मी १२ वर्षांची होते तेव्हा माझ्यावर बलात्कार झाला होता. माझी हत्या करण्याचा प्रयत्न झाला. माझी ओळख लपवली गेली. हत्या, अपहरण या गोष्टी सर्रास होत आहेत त्यामुळे लोकांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. माझा विभक्त नवरा कायमच मला सांगायचा की मी पोलिसांना पैसे घालून सगळं काही करुन घेतो. माझी पोलिसांनी मदत केली नाही. सगळेच पोलीस वाईट असे नाहीत. पण माझी आई जिवंत होती तरी तिला गायब करण्यात आलं. तसंच माझ्यावर बलात्कार झाला तेव्हा मला मुळीच न्याय मिळाला नाही. ” असं हाजी मस्तानच्या मुलीने म्हणजेच हसीन मस्तानने सांगितलं. हसीनने टीव्ही ९ भारत वर्षशी संवाद साधला त्यावेळी तिने आपबिती सांगितली.

माझी मालमत्ता हडप करण्याचं षडयंत्र होतं-हसीन मस्तान

माझी जुहूमध्ये मालमत्ता आहे, एक बंगला आहे. तो हडप करण्यासाठी माझी ओळख लपवण्यात आली. माझ्या आईला माझ्यापासून दूर करण्यात आलं. माझ्या वडिलांनी मृत्यू पत्रात लिहून ठेवलं होतं की मुलीचं म्हणजेच माझं शिक्षण लंडनमध्ये होईल. पण मला घ्यायला कुणी आलंच नाही. या सगळ्या गोष्टी मी ज्याच्यापासून तलाक घेतला त्या नवऱ्याला कळल्या होत्या. त्याने या सगळ्याचा गैरफायदा घेतला. मी १२ वर्षांची होते त्यावेळी माझ्यावर बलात्कार करण्यात आला. मला काय झालं ते कळलंही नाही. त्या पुरुषाशी माझं सक्तीने लग्न लावण्यात आलं होतं. खूप कमी लोक होते. लग्नाचा कुठलाही पुरावा त्याने ठेवला नाही. मला प्रचंड टॉर्चर करण्यात आलं. एवढंच नाही तर माझ्या पोटात त्याचं मूल होतं त्याचा गर्भपात करण्यात आला, असंही हसीन मस्तानने सांगितलं.

वयाच्या १२ व्या वर्षापासून संघर्ष

हसीन पुढे म्हणाली, मी १२ व्या वर्षांची असल्यापासून संघर्ष करते आहे. मी घरातून अनेकदा पळून गेले. २०१४ ला त्याने पोलिसांना बोलवून घेतलं होतं. पोलीस मला ताब्यात घेतलं होतं. सलमान खान, शाहरुख खान यांच्याबरोबर तिला काम करायचं आहे असं खोटं सांगितलं. पोलीस आले त्यांना मी काय झालं ते सांगितलं. गर्भपात झाल्याचं सांगितलं. मात्र पोलिसांना त्याने पैसे खाऊ घातले ज्यानंतर पोलीस निघून गेले. मला माहीत नाही की पैसे दिले की नाही पण पोलीस तेव्हा निघून गेले. शिवाय २०१४ मध्ये माझी आई गेली. काही दिवसांनी मला एकता कपूरची सीरियल मिळाली. काही वेब सीरिज मिळाल्या. तेव्हा त्याने सेटलमेंटची तयारी दाखवली अशी माहिती हसीनने दिली. माझा विभक्त नवरा हा माझ्या मामाचा मुलगा आहे. माझ्या एक्स नवऱ्याने चार लग्न केली होती आणि त्यानंतर माझ्याशी लग्न केलं. माझ्याशी लग्नानंतर त्याने आणखी तीन लग्न केलं. त्या मुलींनी समोर आलं पाहिजे असंही हसीन मस्तानने म्हटलं आहे.