फेरीवाल्यांसाठी आणखी ५७ हजार जागा

यापूर्वीच पालिकेने २२ हजार जागा जाहीर केल्या आहेत.

auto rickshaw, hawakers, morcha,thane municipal corporation
प्रतिनिधिक छायाचित्र

एकीकडे पदपथांवरून अतिक्रमणे हटवत असतानाच महापालिकेने फेरीवाल्यांसाठी विविध उपनगरांत रस्ते आणि जागा आरक्षित करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर फेरीवाल्यांसाठी आखण्यात आलेल्या आणखी ५७ हजार जागांची व रस्त्यांची माहिती जाहीर करण्यात आली. त्यासंबंधी स्थानिकांकडून सूचना व हरकती मागवण्यात आल्या असून त्यानंतर या जागा निश्चित केल्या जातील. यापूर्वीच पालिकेने २२ हजार जागा जाहीर केल्या आहेत.

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर शहरातील पदपथविक्रेत्यांचे नियोजन करण्याच्या कामाला वेग आला. त्यानुसार एकीकडे प्रशासकीय अधिकारी व संघटना प्रतिनिधींची नगर पदपथविक्रेता समिती स्थापन करण्यासोबतच शहरातील फेरीवाल्यांना सामावून घेण्यासाठी जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. यानुसार आतापर्यंत तब्बल ७८ हजार ७६० जागा फेरीवाल्यांसाठी महापालिकेकडून आखण्यात आल्या आहेत. त्यातील २२ हजार ९७ जागांची पहिली यादी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता आणखी ५६ हजार ६७० जागांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. पूर्व उपनगरातील कुर्ला, गोवंडी, मुलुंड, पश्चिम उपनगरातील मालाड, गोरेगाव, कांदिवली आणि शहर भागात दक्षिण मुंबई, लालबाग, परळ, दादर, माटुंगा, माहीम या परिसरात फेरीवाल्यांसाठी जास्त जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. त्यासाठी १०२४ रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही याद्यांसंबंधी ३१ जानेवारीपर्यंत सूचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत.

केंद्र सरकारच्या पदपथ विक्रेते अधिनियमानुसार राज्य सरकारने पदपथविक्रेता योजना जाहीर केली होती. त्यानुसार महापालिकेने २०१४ मध्ये फेरीवाल्यांची नोंदणी करण्यास सुरुवात केली होती. या सर्वेक्षणादरम्यान फेरीवाल्यांचे ९९ हजार ४३५ अर्ज आले होते. मधल्या काळात याबाबत कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर आता फेरीवाल्यांच्या अर्जाची छाननी सुरू करण्यात आली आहे, तसेच त्यावेळी आखण्यात आलेल्या २२ हजार जागाही नव्याने जाहीर करण्यात आल्या.

दादरमध्ये गर्दी होणारच!

पहिल्या यादीत दादर, वरळी, प्रभादेवी, माटुंगा, माहीम परिसरात फेरीवाल्यांना कमी जागा देण्यात आल्या होत्या, मात्र या दुसऱ्या यादीत प्रशासनाने ही कसर भरून काढली आहे. या यादीत परळ, लालबाग आणि दादरमध्ये मोठय़ा प्रमाणावर जागा देण्यात आल्या आहेत. तर गोवंडी, चेंबूरमधील सर्वाधिक ११२ रस्ते फेरीवाला झोन म्हणून निवडण्यात आले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Hawkers land issue bmc