scorecardresearch

मुंबई : सुशोभित केलेले पदपथ फेरीवाल्याना आंदण; अंधेरीत फेरीवाल्यांनी पदपथ व्यापले

अंधेरीत ठिकठिकाणी असे चित्र दिसत असून त्याविरोधात समाज माध्यमांवर तक्रारीही केल्या जात आहेत.

मुंबई : सुशोभित केलेले पदपथ फेरीवाल्याना आंदण; अंधेरीत फेरीवाल्यांनी पदपथ व्यापले
(संग्रहित छायाचित्र) ; इंडियन एक्स्प्रेस

मुंबई महानगपालिकेने सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत सुशोभित केलेल्या पदपथांवर अनेक ठिकाणी फेरीवाल्यांनी आपले व्यवसाय थाटले आहेत. अंधेरीतील सुशिभोत केलेले पदपथ फेरीवाल्यांनी बिनधास्त व्यापले आहेत. आंदण दिल्याप्रमाणेच फेरीवाल्यांनी पदपथावरील जागा व्यापली आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

हेही वाचा >>> मुंबई: पश्चिम रेल्वेच्या आठ विशेष लोकल फेऱ्या; ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री सुविधा

मुंबई महानगरपालिका सध्या एकाच वेळी दोन प्रकल्प राबवत आहे. एका बाजूला मुंबई सुशोभिकरण प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत फेरीवाल्यांकडून मोठ्या संख्येने अर्ज भरून घेण्याचे कामही सुरू आहे. या दोन योजनांचा एकमेकांशी काहीही संबंध नसला तरी त्यात फेरीवाल्यांचा दुहेरी फायदा झाला आहे.

स्वनिधी योजनेसाठी मोठ्या संख्येने फेरीवाल्यांचे अर्ज भरून घेतले जात आहेत. महानगरपालिका अधिकाऱ्यांना अर्ज भरण्याचे उद्दिष्ट्य ठरवून दिले आहे. ते पूर्ण करण्यासाठी फेरीवाल्यांची मनधरणी करावी लागत आहे. त्यामुळे फेरीवाल्यांविरोधातील मोहिमेची धार बोथट झाली आहे. याचाच परिणाम म्हणून गेल्या काही दिवसात फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. तसेच पदपथांवरील त्यांचा पसाराही वाढला आहे. तर दुसरीकडे महानगरपालिकेने सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत मुंबईतील पदपथांचे सुशोभिकरण, सपाटीकरणाची कामे हाती घेतली आहेत. असे सुशोभित झालेले पदपथ आता या फेरीवाल्यांनी व्यापले आहेत.

हेही वाचा >>> मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग: वाहनांच्या भरधाव वेगाला कारवाईची वेसण; प्रतितास १८० किलोमीटर वेगाने वाहनांची धाव

अंधेरीत ठिकठिकाणी असे चित्र दिसत असून त्याविरोधात समाज माध्यमांवर तक्रारीही केल्या जात आहेत. अंधेरीतील वॉचडॉग फाऊंडेशन या संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते पिमेंटा गॉडफ्रे यांनी या प्रकरणी मुख्यमत्री एकनाथ शिंदे आणि महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र लिहिले आहे. अंधेरी कुर्ला मार्ग, तसचे जे. बी. नगर येथील पदपथांवर फेरीवाल्यांनी आपले व्यवसाय थाटले आहेत. पादचाऱ्यांना त्यातून वाट काढतच चालावे लागत आहे. त्यामुळे सुशोभिकरणानंतर पादचाऱ्यांचा फायदा होण्याऐवजी फेरीवाल्यांचे फावल्याचा आरोप गॉडफ्रे यांनी केला आहे. रेल्वे स्थानकाच्या १०० मीटर परिसरात ‘ना फेरीवाला’ क्षेत्राची अंमलबजावणीही मागे पडली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-12-2022 at 23:24 IST

संबंधित बातम्या