मुंबई: खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर अनुप बागची यांची नियुक्ती गुरुवारी घोषित करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिल्यानंतर बँकेने गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाने हा निर्णय शेअर बाजाराला सूचित केला.
एचडीएफसी बँकेचे विद्यमान मुख्याधिकारी शशिधर जगदीशन यांचा कार्यकाळ २६ ऑक्टोबरला संपत असून, बागची हे २७ ऑक्टोबर २०२६ रोजी बँकेच्या मुख्याधिकारीपदाची सूत्रे स्वीकारतील. अनेकांगाने वादग्रस्त कारकीर्द राहिलेल्या जगदीशन यांनी पुनर्नियुक्ती अथवा मुदतवाढीबाबत ते अनुत्सुक असल्याचे जाहीर केले होते. बागची यापूर्वी आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी होते. एचडीएफसी बँकेने या पदासाठी बागची यांच्यासह बँकेचे उपव्यवस्थापकीय संचालक कैझाद भरुचा यांची नावे रिझर्व्ह बँकेकडे पाठविल्याचे यापूर्वी वृत्त होते.
रिझर्व्ह बँकेने अनुप बागची यांची बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे. त्यांचे वेतन आणि अन्य अटी रिझर्व्ह बँकेने मंजूर केल्याप्रमाणे असतील. या नियुक्तीसाठी कंपनी कायदा, २०१३ मधील तरतुदींनुसार भागधारकांची मंजुरी घेणे आवश्यक आहे.
कोटक महिंद्र बँकेवरही अनुप साहा
दुसरीकडे खासगी क्षेत्रातील दुसरी अग्रणी असलेल्या कोटक महिंद्र बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी पदासाठी अनुप कुमार साहा यांच्या नियुक्तीला रिझर्व्ह बँकेने गुरुवारी मंजुरी दिली. साहा १ जानेवारी २०२७ पासून तीन वर्षांसाठी या पदाची सूत्रे स्वीकारतील, अशी माहिती बँकेने दिली. साहा यांची या वर्षाच्या सुरुवातीला कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि ते किरकोळ बँकिंग, डेटा ॲनालिटिक्स व विपणन विभागांचे कामकाज पाहत आहेत. बँकेचे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी अशोक वासवानी यांनी कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा नियुक्ती न घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे साहा यांची पदोन्नती आवश्यक ठरली. कोटक महिंद्र बँकेत येण्यापूर्वी त्यांनी आयसीआयसीआय बँकेत दीर्घकाळ कारकीर्द आणि बजाज फायनान्स या बँकेतर वित्तीय कंपनीतही त्यांनी काम केले आहे.
गुरुवारच्या सत्रात एचडीएफसी बँकेचा समभाग १.७६ टक्क्यांनी वधारून ७२१.५० रुपयांवर बंद आला. तर कोटक महिंद्रा बँकेच्या समभागाला गुंतवणूकदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. कोटक बँकेचा समभाग ४१८.३५ रुपयांवर स्थिरावला.
