एखादी गोष्ट लिहिताना त्याला अनुरूप असे काही चेहरे लेखक-दिग्दर्शकाच्या मनात असतात, तर काहींचे चेहरे समोर आले की त्यांच्या अनुषंगानेच कथा सुचत जाते. जणू काही ती कथा फक्त त्यांच्यासाठीच लिहिलेली असावी, अशीच भावना प्रिया बापट-उमेश कामत या जोडीची, वरुण नार्वेकर लिखित, दिग्दर्शित ‘हे काय नवीन?’ ही झी ५ वर प्रदर्शित झालेली वेबमालिका पाहताना मनात रेंगाळते.
चाळीशीच्या जवळ आलेल्या जोडप्याची कथा या वेबमालिकेत आहे. आदित्य आणि रमा हे सुखवस्तू आयुष्य जगणारं जोडपं. मात्र, वयाच्या या एका टप्प्यावर पोहोचल्यानंतर रमाच्या मनात भल्यामोठ्या पगाराची नोकरी सोडून स्वत:चा कपड्यांचा व्यवसाय सुरू करावा असा विचार घोळू लागतो. आपल्या मनात चाललेल्या या कल्लोळाला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी रमा राजीनामा न देता चार महिन्यांची सुट्टी घेत असल्याचं आई-बाबांना आणि नवर्याला सांगते. सगळं काही सुरळीत चाललेलं असताना अचानक रमाला हे काय नवीन सुचलं आहे? या आईवडिलांच्या प्रतिक्रियेपासून वेबमालिकेची खरी गोष्ट सुरू होते असं म्हणायला हरकत नाही. रमा हळवी आहे, अति संवेदनशील आहे, तितकीच आपल्या मतांबद्दल, विचार-कामांबाबत आग्रही आहे. स्वत:चे निर्णय स्वत:च घ्यायचे आणि ते निभवायचे, याबाबतीतही ती ठाम आहे. तर आदित्यला रमाचा स्वभाव अगदी पुरेपूर माहिती आहे. रमाच्या या निधड्या, आत्मविश्वासपूर्ण स्वभावाचं, तिच्या कामाचं… सगळ्याचंच त्याला कौतुक आहे. आणि ते मनापासून आहे. या दोघांचंही एकमेकांवर निरातिशय प्रेम आहे. त्यामुळे एकमेकांवर प्रेम करत आयुष्य सुंदर जगायचं, रोजचा नवीन काही अनुभव घ्यायचा हा नव्या पिढीप्रमाणे या दोघांचाही स्वभाव आहे. मात्र, रमाने चांगली नोकरी सोडून अचानक व्यवसाय करण्याचा घेतलेला निर्णय तिच्या आईच्या पचनी पडलेला नाही. तिने आणि आदित्यने आता तरी बाळाचा विचार करावा, चाळिशी उलटल्यानंतर या गोष्टी सहजपणे घडणार नाहीत, म्हणून रमाचे आईवडील अधूनमधून तिला बाळाच्या विचारापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत राहतात. या अशा काहीशा विरोधी वातावरणातही रमा तिचा व्यवसाय कसा सुरू करते, त्यात येणारे अडथळे, जोडली जाणारी नवनवीन माणसं, आईच्या बोलण्याचा तिच्यावर होणारा परिणाम, कामाच्या रगाड्यात हरवून गेलेल्या रमा आणि आदित्यला एकमेकांसाठी वेळ काढताना होणारी दमछाक, त्याचबरोबर आपल्याला नेमकं काय हवं आहे याचा नकळतपणे रमाच्या मनात सुरू असलेला शोध असे अनेक पैलू या वेबमालिकेच्या आठ भागांतून उलगडत जातात.
लेखक-दिग्दर्शक म्हणून वरुण नार्वेकर याने खूप सहज, ओघवत्या पध्दतीने या वेबमालिकेची कथामांडणी केली आहे. ही वेबमालिका बव्हंशी रमाच्या नजरेतून नात्यांचा, घटनांचा, सभोवतालच्या माणसांचा वेध घेते. या वेबमालिकेचा विषय तसा साधा आणि छोटा आहे, पण तो खुलवताना लेखक म्हणून वरुणने आदित्य आणि रमाच्या नात्यातल्या छोट्या-छोट्या प्रसंगांची खूप सुरेख मांडणी केली आहे. या मालिकेत येणार्या व्यक्तिरेखा पंचवीस ते चाळीस या वयोगटातल्या आहेत. त्यामुळे साहजिकच अगदी तरुण ते मध्यमवयीन अशा वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यातल्या तरुण पिढीचे विचार, त्यांचा दृष्टिकोन यात प्रामुख्याने पाहायला मिळतो. त्याचबरोबर एकमेकांवर खूप प्रेम असलं तरी पती-पत्नी म्हणून बदलत जाणारं नातं, व्यावसायिक-वैयक्तिक आयुष्याची घडी सांभाळताना हमखास जोडप्यांमध्ये कमी होत जाणारा संवाद, मग मनात निर्माण होणार्या पोकळीचा विचार करताना एकमेकांबरोबर राहण्यासाठी, संवाद टिकवण्यासाठी शोधले जाणारे पर्याय यातून आजच्या पिढीचं जगणं खूप वास्तव पध्दतीने आपल्यासमोर येतं. हे करत असताना रमाच्या आई-वडिलांच्या रुपाने जुन्या पिढीचेही विचार, त्यांचाही दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न यात दिग्दर्शकाने केला आहे.
या वेबमालिकेची प्रत्येक दृश्यचौकट ही आखीव रेखीव आहे, तितकीच देखणीही आहे. रमाचं व्यक्तिमत्व आणि तिचा डिझायनर नाममुद्रा ‘कला’ची निर्मिती आणि विस्तार यात असल्याने खूप सौम्य, उबदार रंगांबरोबरच काही चमकदार रंगांचा वापर करत केलेली कलात्मक दृश्यनिर्मिती सुखावणारी आहे. त्यामुळे वेबमालिकेत कथानकात थोडंफार भावनिक नाट्य वरखाली होत राहिलं तरीही पाहणार्याच्या मनात एक निवांत भावना असते. शेवटच्या काही भागांमध्ये प्रसंग थोडे अधिक हळवे होत जातात. प्रिया बापट आणि उमेश कामत या दोघांच्याही व्यक्तिमत्वाचा सुरेख वापर यात झाला आहे. रमाच्या सगळ्या भावछटा अतिशय सहजपणे प्रियाने साकारल्या आहेत. तर उमेशच्या व्यक्तिरेखेत असलेली विनोदबुध्दीची झाक, त्याचे हलकेफुलके संवाद याने रंगत आणली आहे. या दोघांबरोबरच तीन-चार नवनवीन व्यक्तिरेखा मध्ये मध्ये डोकावत राहतात. बाकी फार पात्रांचा यात पसारा नाही. रमाच्या आईच्या भूमिकेत शुभांगी गोखले उठून दिसल्या आहेत. त्यांच्यातले आणि रमातले ताणेबाणे हे अगदी कोणत्याही मायलेकीला सहज स्वत:शी जोडून घेता येतील असे आहेत. तर तिच्या वडिलांच्या भूमिकेत उदय टिकेकर यांना खूप दिवसांनी पाहण्याची संधी वेबमालिकेने दिली आहे. आदित्यची कौटुंबिक पार्श्वभूमी काही प्रमाणात यायला हवी होती, त्याशिवाय काही प्रसंग आणि विषयांच्या मांडणीत तुटकपणा जाणवत राहतो. तो भाग सोडला तर उमेश कामत आणि प्रिया बापट या जोडीच्या चाहत्यांना आवडेल अशी ही वेबमालिका आहे.
हे काय नवीन?
ओटोटी – झी फाईव्ह
दिग्दर्शक – वरूण नार्वेकर
कलाकार – उमेश कामत, प्रिया बापट
