scorecardresearch

मुंबई : गोवरचा उद्रेक कमी झालेल्या भागातील आराेग्य केंद्रे बंद

गोवरचा मुंबईमध्ये उद्रेक झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेकडून प्रभागांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली होती.

bmc
मुंबई महानगरपालिका (संग्रहित छायाचित्र)

गोवरचा मुंबईमध्ये उद्रेक झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेकडून प्रभागांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली होती. मात्र मागील काही दिवसांपासून गोवरची रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ज्या भागामध्ये उद्रेक नाही, त्या प्रभागातील लसीकरण केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईतील सहा आरोग्य केंद्र बंद करण्यात आली आहेत.

हेही वाचा >>>नायर रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी केला मानवी शरीरावर थेट सराव, सरकारी रुग्णालयामध्ये प्रथमच अशी सुविधा

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार शेवटच्या ताप व पुरळ आलेला रुग्ण सापडल्यानंतर पुढील २८ दिवसामध्ये एकही ताप व पुरळ रुग्ण सर्वेक्षणात आढळून आलेला नाही. अशा भागातील गोवरचा उद्रेक आटोक्यात आल्याचे समजण्यात येते. त्यामुळे मुंबईतील अप्पापाडा, शांतीनगर, सर्वोदय, पांजरपोळ, हिमालया, नेहरू नगर येथील आरोग्य केंद्रे मुंबई महानगरपालिकेने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील जानेवारी २०२३ मध्ये ३५ लाख ८० हजार २८४ घरांचे आतापर्यंत गोवरसाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात ताप व पुरळ असलेले ३७८ रुग्ण आढळले. ऑक्टोबरच्या शेवटी गोवर संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे महानगरपालिकेने ज्या ठिकाणी संसर्गित रुग्णसंख्या अधिक असल्याचे दिसून आले तेथे त्वरित लसीकरण मोहिमेला सुरवात केली.

हेही वाचा >>>मुंबईच्या अनेक भागात ४८ तास पाण्याविना, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील अनेक विभागात पाणी पुरवठा झालाच नाही

९ महिने ते पाच वर्ष वयोगटामधील ८२ आरोग्य केंद्रातील एकूण २ लाख ३२ हजार १५९ बालकांपैकी १ लाख ६८ हजार ३८६ म्हणजे ७२.५३ टक्के बालकांना आतापर्यंत गोवर रुबेला लसीची अतिरिक्त मात्रा देण्यात आली आहे. तर सहा महिने ते नऊ महिने या वयोगटामध्ये २३ आरोग्य केंद्रातील ज्या ठिकाणी नऊ महिन्यापेक्षा कमी वयाच्या बालकांमध्ये गोवर रुग्णांचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा अधिक आहे अशा आरोग्य केंद्रातील एकूण ५११४ बालकांपैकी ३८४४ म्हणजे ७५.१७ टक्के बालकांना आजपर्यंत गोवर रुबेला लसीची मात्रा देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 22:39 IST