लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : कर्करोगाचे निदान वेळीच होण्यासाठी सरकार अनेक पातळ्यांवर प्रयत्नशील आहे. कर्करोगाची प्राथमिक लक्षणे जाणवल्यानंतर रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रांत उपचार घेत असल्याने आजाराचे वेळेत निदान होण्यात अनेक अडचणी निर्माण होतात. रुग्ण मोठ्या रुग्णालयात जाईपर्यंत त्याचा आजार अखेरच्या टप्प्यात पोहोचलेला असतो. त्यामुळे वेळीच निदानासाठी देशातील प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षम करण्याची गरज असल्याचे मत कर्करोग तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
कर्करोग पूर्णत: बरा होऊ शकतो. मात्र त्याचे वेळीच निदान होणे गरजेचे आहे. कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी त्याचे वेळीच निदान होणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी देशातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षम करण्याची आवश्यकता आहे. प्राथमिक स्तरावर कर्करोग झाल्याचे लक्षात आल्यावर हा आजार तीन ते चार आठवडे लवकर बरा होण्याची शक्यता असल्यासे टाटा रुग्णालयाचे माजी संचालक डॉ. अनिल डिक्रूझ यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
आणखी वाचा-धारावीतील ११ हजार झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण
कर्करोग देखभाल केंद्र
दुर्मीळ कर्करोगाचे जवळपास २०० प्रकार आहेत. कर्करोगाच्या एक लाख रुग्णांपैकी सहा रुग्णांना असा कर्करोग होतो. यात प्रामुख्याने सार्कोमा, त्वचेचा कर्करोग, गरोदरपणातील कर्करोग, अनुवांशिक कर्करोग, न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर्स अशा विविध प्रकारच्या कर्करोगांचा समावेश आहे. कर्करोगांचे निदान प्राथमिक स्तरावर झाल्यास रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे करणे अधिक सोपे असते. यासाठी युरोप व आशियात या दुर्मीळ कर्करोगांवर उपचार करण्यासाठी अधिकाधिक कर्करोग देखभाल केंद्र सुरू करण्याची युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलॉजीचा विचार सुरू असल्याचे ज्येष्ठ कर्करोग तज्ज्ञ डॉ. ज्योती वाजपेयी यांनी सांगितले.