मुंबई :  सार्वजनिक आरोग्य विभागात बदल्यांच्या निमित्ताने चालणाऱ्यम देवाण-घेवाणीवर लवकरच निर्बंध येणार आहेत. यापुढे आरोग्य विभागातील शिपायापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वाच्या ऑनलाइन बदल्या करण्याचा निर्णय आयोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतला आहे.

   त्याचप्रमाणे महिलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी नवरात्रोत्सवात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानात अठरा वर्षांवरील सुमारे तीन कोटी महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे.

बदल्यांमधील गोंधळ, आरोप-प्रत्यारोपापासून लांब राहण्याचा निर्णय आरोग्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यानुसार विभागातील सर्व बदल्या केवळ ऑनलाइनच करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यासाठी एक अ‍ॅप तयार करण्यात येणार असून बदलीस पात्र कर्मचाऱ्यांनी तीन पर्याय द्यावेत. बदल्यांसाठी कोणाचेही शिफासरपत्र चालणार नाही. कर्मचाऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर ऑनलाइन पद्धतीनेच या बदल्या होतील, अशी माहिती सावंत यांनी दिली.

 ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियाना’त सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत १८ वर्षांवरील महिलांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज तपासणी शिबिरे घेण्यात येतील. उपकेंद्र आणि आरोग्यवर्धिनी केंद्र स्तरावर समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत मातांची तपासणी, समुपदेशन कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. ग्रामीण रुग्णालय आणि त्यावरील रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात येणार आहे. या कालावधीत मानवविकास कार्यक्रमांतर्गत तज्ज्ञांची शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत, असे सावंत यांनी सांगितले.

अन्य विभागांचाही सहभाग

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियाना’त  महानगरपालिका, आदिवासी विकास विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, शालेय शिक्षण विभाग, ग्रामविकास विभाग यांचाही सहभाग घेतला जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.