मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘क’ आणि ‘ड’ गटाच्या झालेल्या परीक्षांचा पेपर फुटल्यामुळे या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. तसेच या परीक्षा येत्या दोन ते तीन महिन्यांत ‘टीसीएस’ किंवा ‘एमकेसीएल’मार्फत राबविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील २७३९ आणि गट ड संवर्गातील ३४६६ अशा एकूण ६२०५ पदांसाठी भरती प्रक्रिया गेल्यावर्षी ऑगस्टमध्येच जाहीर करण्यात आली होती. परंतु आता याला जवळपास नऊ महिने उलटले तरी या परीक्षांचा गोंधळ सुरूच असल्याने भरती प्रक्रिया रखडलेली आहे. दुसरीकडे परीक्षार्थीना परीक्षेबाबतही काही ठोस माहिती गेल्या काही महिन्यांमध्ये दिलेली नसल्याने तेही निकालाची वाट पाहत ताटकळत राहिले आहेत.

आरोग्य विभागाच्या या पदांसाठीची भरती परीक्षा सप्टेंबरमध्ये जाहीर केली होती. यासाठी न्यासा कंपनीची निवड सामान्य प्रशासन विभागाने केली होती. परंतु ऐनवेळी या परीक्षेसाठी आवश्यक तयारी कंपनीने न केल्यामुळे नियोजित वेळेच्या काही तास आधी ही परीक्षा रद्द करावी लागली. त्यानंतर कंपनीवर कारवाई करण्याऐवजी पुन्हा याच कंपनीला परीक्षा घेण्याची परवानगी सामान्य प्रशासन विभागाने दिली. त्यानुसार गट क आणि ड संर्वगासाठीची परभरती परीक्षा न्यासामार्फत ऑक्टोबरमध्ये घेण्यात आल्या. या दोन्ही परीक्षांचे पेपर फुटल्याचे काहीच महिन्यांमध्ये उघडकीस आले आणि याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला. यामध्ये पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले असून आरोग्य अभियानाच्या सहसंचालकांसह आणखी काही जणांना यात अटकही झाली आहे. डिसेंबरपासून हा तपास सुरू असूनही परीक्षाबाबतचा ठोस निर्णय सरकारने जाहीर न केल्यामुळे विद्यार्थी वर्गामध्ये मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.

आरोग्य विभागाच्या क आणि ड या दोन्ही संवर्गासाठीच्या ऑक्टोबरमध्ये घेतलेल्या परीक्षा रद्द करण्यात करण्याचा निर्णय झाला आहे. या दोन्ही परीक्षा नव्याने घेण्यात येतील. यासाठी एमकेसीएल किंवा टीसीएस यापैकी एका संस्थेची निवड करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया साधारण पुढील दोन ते तीन महिन्यात पूर्ण होऊन पदभरती केली जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले. पेपर फुटलेल्या परीक्षांचा निकाल रोखून अन्य निकाल जाहीर करण्याची मागणी विद्यार्थ्यांमार्फत केली जात आहे. ‘ड संवर्गाच्या परीक्षेचा पेपर फुटला आहे, हे पोलिसांच्या तपासात आढळले आहे. तसेच क संवर्गासाठी घेतलेल्या परीक्षेचा पेपर ही ५०० जणांपर्यत पोहचल्याचे पोलीस तपासातून निदर्शनास आले आहे. त्यामुळे एकाही उमेदवारावर अन्याय नको या दृष्टीने या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, ’असे टोपे यांनी सांगितले. ही परीक्षा पारदर्शीपणे आणि लवकरात लवकर घेण्याचे आमचे उद्दिष्ट होते. या आधीही या पदाच्या सुमारे पाच हजार पदांची भरती २०२१ मध्ये विभागाने केली. परंतु आधी कंपनीमुळे आणि नंतर पेपर फुटल्याने ही परीक्षा रखडली आहे. त्यामुळे ही परीक्षा प्रक्रिया लवकरात लवकर आणि योग्यरितीने पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. ही परीक्षा आता एमकेसीएल किंवा टीसीएस यापैकी एका कंपनीच्या माध्यमातून ऑनलाईन घेतली जाणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.

उमेदवारांना पुन्हा अर्ज भरण्याची आवश्यकता नाही

या परीक्षांसाठी आधी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांची तपशीलवार माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे परीक्षा नव्याने राबविण्यात येणार असली तरी उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. उपलब्ध माहिती आधारे प्रवेशपत्रासह पुढील माहिती विद्यार्थ्यांना कळविण्यात येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. .. वयोमर्यादेमुळे पात्र न ठरणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सूट देण्याची मागणी परीक्षा पुन्हा घेतल्यामुळे काही विद्यार्थी वयोमर्यादेमध्ये बसत नसल्याने या परीक्षेसाठी पात्र न ठरण्याची शक्यता आहे. तेव्हा विशेष बाब म्हणून या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आम्ही सामान्य प्रशासन विभागाकडे करणार आहोत. परंतु याबाबतचा सेवा नियमनाबाबतच्या नियमावलीनुसार निर्णय घेण्याचा अधिकार सामान्य प्रशासन विभागाला आहे. त्यामुळे याबाबतचा अंतिम निर्णय या विभागाचा असेल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health department recruitment exam canceled re examination mkcl tcs ysh
First published on: 25-05-2022 at 00:06 IST