मुंबई : नियमित व्यायाम आणि जिममधील कसरत अचानक थांबवली तर शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होतात असे निष्कर्ष विविध आंतरराष्ट्रीय संशोधन अहवालांमधून समोर आले आहेत. विशेषतः स्नायूंची ताकद, आकार आणि शरीराची एकूण क्षमता काहीच आठवड्यांत कमी होऊ लागते ही बाब चिंताजनक मानली जात आहे.तज्ञांच्या मते व्यायाम थांबवल्यानंतर शरीर ‘डिट्रेनिंग’ प्रक्रियेत जाते. या प्रक्रियेमुळे स्नायूंना मिळणारा ताण कमी होतो आणि त्यांचा आकार हळूहळू घटू लागतो. यालाच ‘मसल अ‍ॅट्रॉफी’ असे म्हटले जाते. परिणामी शरीर सैल दिसू लागते आणि पूर्वीची ताकद कमी झाल्याचे जाणवते.

व्यायामामुळे स्नायूंवर सातत्याने ताण येत असतो. मात्र हा ताण अचानक थांबल्यास शरीर उलट दिशेने प्रतिक्रिया देऊ लागते. या प्रक्रियेला “डिट्रेनिंग” असे म्हटले जाते. या अवस्थेत स्नायूंचे आकुंचन (मसल अ‍ॅट्रॉफी) सुरू होते आणि त्यांची कार्यक्षमता कमी होते असे अभ्यासातून दिसून आले आहे. २०२४ मध्ये प्रकाशित एका आंतरराष्ट्रीय संशोधनानुसार केवळ १ ते २ आठवडे व्यायाम बंद ठेवल्यासही स्नायूंमध्ये घट होण्याची प्रक्रिया सुरू होते. तसेच २ ते ४ आठवड्यांत स्नायूंचा आकार आणि ताकद यामध्ये स्पष्ट घट दिसून येते. यामुळे शरीर सैल दिसू लागते आणि पूर्वीची क्षमता कमी झाल्याचे जाणवते.

याशिवाय पबमेड वर प्रकाशित एका अभ्यासात १२ आठवड्यांच्या डिट्रेनिंगनंतर स्नायूंची ताकद आणि आकार दोन्ही घटल्याचे आढळले आहे. दीर्घकाळ व्यायाम बंद ठेवल्यास हा परिणाम अधिक तीव्र होतो. २०२२ मधील एका मेटा-अनालिसिसनुसार ३१ ते ५२ आठवड्यांच्या विश्रांतीनंतर स्नायूंचा आकार लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे नोंदवण्यात आले आहे.तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, व्यायाम बंद केल्याचा परिणाम केवळ स्नायूंवरच नाही, तर हृदय आणि श्वसन संस्थेवरही होतो. शरीराची ऑक्सिजन वापरण्याची क्षमता घटते, त्यामुळे थकवा लवकर जाणवतो आणि दैनंदिन कामांमध्ये अडथळे निर्माण होतात.

दरम्यान, स्नायू थेट चरबीत रूपांतरित होतात हा समज चुकीचा असल्याचेही संशोधनातून स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्षात स्नायूंचा आकार कमी होतो आणि ऊर्जा खर्च घटल्यामुळे शरीरात चरबी साठण्याचे प्रमाण वाढते.तथापि, तज्ज्ञांच्या मते व्यायाम पुन्हा सुरू केल्यास स्नायू पूर्वस्थितीत येऊ शकतात ‘मसल मेमरी’ या संकल्पनेमुळे शरीराला पूर्वीची ताकद तुलनेने लवकर परत मिळते.एकूणच संशोधन अहवालांनुसार अचानक व्यायाम थांबवणे हे शरीराच्या तंदुरुस्तीवर थेट परिणाम करणारे ठरते. त्यामुळे दीर्घकाळ ब्रेक घेण्यापेक्षा नियमित व्यायाम सुरू ठेवणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे. व्यायाम पुन्हा सुरू केल्यास स्नायू पूर्ववत होण्याची क्षमता शरीरात असते ही सकारात्मक बाब आहे. मात्र त्यासाठी सातत्य आणि योग्य आहार यांची जोड आवश्यक असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले.