मुंबई: कोकिलाबेन, लीलावती, हिंदुजा, नानावटी, बाॅम्बे हाॅस्पिटल, अपोलो, ज्युपिटर यासारख्या बड्या रुग्णालयातही केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत व राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांचा सक्रीय सहभाग सुरु व्हावा, अशी अपेक्षा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली.
मुंबई महानगर क्षेत्रातील नामांकित खासगी रुग्णालयांनी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत सहभाग घ्यावा यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एक बैठक पार पडली. गरीब व गरजू नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा शासनाचा प्रमुख उद्देश आहे. या दृष्टीने एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक रुग्णांना मिळवा यासाठी सुपर स्पेशालिटी असलेल्या नामांकित खाजगी रुग्णालयांनीही यात सहभाग नोंदवावा. राज्य शासनाने योजनेतील उपचारांच्या संख्येत १३५६ वरून २३९९ वाढ करताना उपचारांचे दर वाढवले आहेत. रुग्णालय पंसतीची प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन पारदर्शक आणि विहित कालमर्यादेत पार पाडण्यात येत आहे.
रुग्णालयांनी गुणवत्ता विषयक निकष पूर्ण केल्यास अतिरिक्त प्रोत्साहन रक्कम देण्यात येत आहे. रुग्णालयांच्या दाव्यांची दयेके कमीत कमी कालावधीत आणि नियमितपणे दिली जात आहेत. एक वर्षात घेतलेल्या सुधारणात्मक निर्णयांमुळे रुग्ण संख्येत, उपचारांत आणि त्यावरील खर्चातही वाढ झाली आहे. याचा विचार करता आता खासगी बडया रुग्णालयांनी या योजनेत सहभागी व्हावे, अशी अपेक्षा आबिटकर यांनी व्यक्त केली. या वेळी रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या योजनेच्या जिल्हा समन्वयकांनी स्थानिक लोकप्रतिनिधी यांचेशी समन्वय साधून काम करावे. लोकप्रतिनिधींनी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर प्रभावी लक्ष ठेवावे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जनआरोग्य समितीच्या नियमीत बैठका घेण्यासाठी लोकप्रतिनिधीनी पुढाकार घ्यावा. योजनेमध्ये सर्व शासकीय रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे सहभागी झालेली असल्याने स्थानिक स्तरावर योजनेतील उपचार उपलब्ध होणेसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आबिटकर यांनी केले. यावेळी आण्णासाहेब चव्हाण यांनी उपचार व दरातील वाढ, रुग्णालय आरक्षित करण्याची ऑनलाईन कार्यपद्धती, योजना राबविण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या लागू केलेल्या प्रणाली, दाव्यांची वेळेवर अदागयी, प्रोत्साहनपर लाभ याविषयी सादरीकरण करून उपस्थित खाजगी रुग्णालयांना माहिती दिली.
