मुंबई : राज्यातील दुर्गम तसेच आदिवासी भागासह ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीची महत्त्वाकांक्षी योजना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आकाराला आली असून राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आगामी दोन महिन्यांमध्ये राज्यात २५ हजार आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांच्या माध्यमातून सुमारे ४० लाख लोकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार त्यांच्यावर पुढील उपचारही केले जाणार आहेत. घाटकोपर येथे १ सप्टेंबरपासून या शिबिरांना सुरुवात करण्यात आली असून ३१ ऑक्टोबरपर्यंत राज्याच्या विविध भागात या शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. जळगाव, चंद्रपूरसह राज्यातील आदिवासी भागात या शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटाकातील रुग्णांसाठी पारदर्शक पध्दतीने उपलब्ध करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाअंतर्गत राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली. या कक्षाच्या माध्यमातून राज्यभरात लोकसहभागातून सामुदायिक आरोग्य शिबिरे भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या शिबिरांच्या आयोजनाच्या मुख्य समन्वयकाची जबाबदारी रामेश्वर नाईक यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या आरोग्य शिबिरांमध्ये विविध धर्मादाय संस्था, वैद्यकीय संघटना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये, निरामय सेवा फाऊंडेशन, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व त्यांच्याशी संलग्नित खासगी वैद्यकीय महाविद्यालये व विद्यार्थी, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालये, समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी, लोकप्रतीनिधी यांचा सहभाग असणार आहे. हेही वाचा >>> Job Vacancies In Mental Hospital : राज्यातील मनोरुग्णालयांमध्ये ५०० रिक्त पदे ही आरोग्य शिबिरे प्रामुख्याने दलित, भटक्या जमातीच्या वस्त्या, आदिवासी पाडे, झोपडपट्ट्या या भागांत राबविण्यात येणार असून शिबिरात विनामूल्य आरोग्य सुविधा मिळणार आहेत. शिबिरात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याबरोबरच त्यांच्या ५९ प्रकारच्या विविध रक्त चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. ईसीजी तपासणी, आयुष्मान भारत योजना कार्डचे वाटप (आभा कार्ड), आवश्यक औषधांचे वाटप, रोगाचे निदान झाल्यास रुग्णावर शासनाच्या आरोग्यविषयक योजनाच्या माध्यमातून उपचारासाठी समन्वय साधणे आणि शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांची माहिती देणे असे या आरोग्य शिबीरांचे स्वरूप असेल, असे राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले. हेही वाचा >>> वाहतूक कोंडीमुक्तीची आशा; सागरी किनारा मार्गाच्या एका बाजूची वांद्रेवरळी सागरी सेतूशी जोडणी साधारणपणे एका शिबीरात १०० ते २५० नागरिकांची तपासणी करण्यात येणार असून सकाळी साडेआठ ते साडेबारापर्यंत शिबीराची वेळ असेल असेही नाईक म्हणाले. या शिबीरात प्रामुख्याने रक्ताच्या ५९ प्रकारच्या चाचण्या करण्यात येणार आहे. ग्रामीण व दुर्गम तसेच आदिवासी विभागात ॲनिमीया तसेच सिकलसेलसह रक्ताचे वेगवेगळे आजार दिसून येतात. अनेकदा त्रास झाल्याशिवाय रुग्ण रक्ततपासणी करत नाही, याचा विचार करून रक्ताच्या वेगवेगळ्या चाचण्या करण्यात येणार आहेत. तसेच हृदयविकाराच्या त्रासाची शक्यता लक्षात घेऊन ईसीजी चाचण्याही करण्यात येणार असून आयुश्मान भारत योजना कार्ड म्हणजे आभा कार्डचे वाटपही केले जाणार आहे. अनेकदा लोकांना शासनाच्या आरोग्य योजनांची व उपचार सुविधांची माहिती नसते. या शिबीरांमधून त्याचीही माहिती दिली जाणार आहे. आरोग्य तपासणी अंतर्गत ज्या लोकांना आजाराचे निदान होऊन उपचाराची आवश्यकता असेल अशा लोकांना रुग्णालयात दाखल करून उपचारही केले जातील. या शिबीराती सर्व चाचण्या या विनामूल्य असतील. प्रामुख्याने शिबीरांचे आयोजन हे दलित वस्ती, आदिवासी पाडे, भटक्या जमातीच्या वस्त्या यांच्या जवळील शाळा, समाजमंदिर, मंदिरे अशा सार्वजनिक ठिकाणी करण्यात येणार असून शिबिराच्या आयोजनाची माहिती एक - दोन दिवस आगोदर आशा समाजसेविका, समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी, स्वयंसेवक यांच्या मार्फत त्या भागातील लोकांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. शिबीरांमध्ये सुमारे पंधराशे रुग्णालयांचा सहभाग असणार आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालये तसेच धर्मादाय रुग्णालयांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी राज्यव्यापी मौखिक आरोग्य अभियानही राबविले असून या अंतर्गत तंबाखू सेवन विरोधी वातावरणही निर्माण करण्यात आले होते. मौखिक आरोग्यबाबत ग्रामीण भागात सजगता निर्माण करणे तसेच व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न या मौखिक आरोग्य शिबीरांच्या माध्यमातून करण्यात आले होते. प्रामुख्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात तंबाखू व बिडी सेवनाचे प्रमाण तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचीच दखल घेत उपमुख्यमंत्री फेडणवीस यांनी यापूर्वी राज्यव्यापी मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबवली होती. मुख्यमत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी ’मोतिबिंदू मुक्त महाराष्ट्र‘ ही संकल्पना राबविली होती. त्यावेळी राज्यात जवळपास १७ लाख मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. जे.जे. रुग्णालयाच्या नैत्रशल्यचिकित्सा विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ तात्याराव लहाने हे मोतिबिंदू मुक्त महाराष्ट्र मोहीमेचे तमन्वयक होते. त्यांच्या अधिपत्याखाली २०१७ मध्ये १७ लाख रुग्णांच्या मोतिबिंदू शस्त्रक्रिया पार पडल्या होत्या व तेव्हाही शासकीय, महापालिका तसेच स्वयंसेवी संस्था आणि खाजगी रुग्णालयांच्या मदतीने ही राज्यव्यापी मोहीम पार पडली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या सव्ल्पनेतून आता राबविण्यात येत असलेली राज्यव्यापी आरोग्य तपासणी मोहीमेतही अशाच प्रकारे समाजातील सर्व घटकांना बरोबर घेण्यात आले आहे.