राज्य शासनाच्या आरोग्य सेवेतून शनिवारी सुमारे ४७ डॉक्टर एकाच दिवशी निवृत्त झाले आणि पुढील वर्षभरात आणखी जवळपास २५० डॉक्टर निवृत्त होणार आहेत, परिणामी राज्याची आरोग्य सेवा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर तातडीने बैठक घेण्यात आली. त्यात डॉक्टरांचे निवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवावे किंवा निवृत्त होणाऱ्या डॉक्टरांना लगेच कंत्राटी पद्धतीवर सेवेत घ्यावे, असे दोन पर्याय पुढे आले आहेत. त्यावर पुढील आठवडय़ात निर्णय होण्याची शक्यता आहे.
राज्यातील जनतेला ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याची शासनाची जबाबदारी आहे. त्यानुसार राज्यात २३ जिल्हा रुग्णालये, ५६ उपजिल्हा रुग्णालये, १८११ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ४० फिरती वैद्यकीय पथके, ३७ आश्रमशाळा आरोग्य तपासणी पथके आणि १० हजार ५८० आरोग्य उपकेंद्रे आहेत. त्यात मोठय़ा प्रमाणावर डॉक्टर, परिचारिका व इतर तांत्रिक मनुष्यबळ गुंतले आहे.
अलीकडे वाढीव वेतन, भत्ते व अन्य सुविधा देऊनही डॉक्टर सरकारी सेवेत यायला फारसे उत्सुक नसतात. त्याऐवजी खासगी रुग्णालयात नोकरी करण्यास किंवा स्वतंत्र व्यवसायाला त्यांची अधिक पसंती असते. त्यामुळे शासकीय आरोग्य सेवेत डॉक्टरांची कमतरता आहे. त्यातच डॉक्टरांची भरती महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत केली जाते. ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने चार-पाच वर्षांपूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतून डॉक्टर भरती मुक्त केली व महाराष्ट्र ज्ञान महामंडळाकडे (एमकेसीएल) ती जबाबदारी दिली. त्यानुसार मधल्या काळात बऱ्यापैकी डॉक्टरांची भरती झाली. परंतु तरीही अनेक जागा रिक्त आहेत. शनिवारी सुमारे ४७ डॉक्टर निवृत्त झाले व येत्या वर्षभरात सुमारे २५० डॉक्टर निवृत्त होणार आहेत. ही आकडेवारी समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शुक्रवारी रात्री उशिरा एक बैठक झाली. या बैठकीला आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनक व काही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, असे समजते. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर डॉक्टर निवृत्त झाले तर, आरोग्य सेवा कोलमडून पडेल, अशी भीती बैठकीत व्यक्त करण्यात आली. त्यावर एक तर डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करा किंवा निवृत्त होणाऱ्या डॉक्टरांना लगेच कंत्राटी पद्धतीने पुन्हा सेवेत सामावून घ्यावे, असे दोन पर्याय पुढे आले आहेत. त्यावर पुढील आठवडय़ात निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्राने दिली.

निवृत्त झालेल्या डॉक्टरांना काही काळ सेवेत ठेवण्याचा तात्पुरता निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्यांचे निवृत्तीचे वय वाढविण्याचा किंवा त्यांना कंत्राटी पद्धतीने सेवेत घेण्याबाबत धोरणात्मक निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे.
– डॉ. दीपक  सावंत