मुंबई, पुणे : गेल्या काही दिवसांपासून दररोज दुपटीने वाढणारी करोना रुग्णसंख्या आणि उपचाराधीन रुग्णसंख्येचा चढता आलेख यामुळे राज्याच्या आरोग्य विभागासह सर्व यंत्रणा सतर्क झाल्या असून राज्यभर दक्षतेच्या सूचना देण्याबरोबरच नागरिकांना मुखपट्टी वापरण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केले आहे.    

सार्वजनिक ठिकाणी तसेच बंदिस्त जागी एकत्र येताना मुखपट्टीचा वापर करण्याचे आवाहन करण्याबरोबरच संशयित रुग्णांच्या त्वरित चाचण्या करण्यावर भर देण्याच्या सूचनाही राज्यभरातील आरोग्य यंत्रणांना करण्यात आल्या आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या करोना कृती दलाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर करण्याच्या आवश्यकतेवर भर देण्यात आला होता. मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर या सहा जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने अधिक दक्षता घेण्याची सूचना केंद्र सरकारनेही महाराष्ट्राला केली आहे.

जानेवारीत ‘ओमायक्रॉन’ या करोना विषाणूच्या नव्या प्रकारामुळे आलेल्या तिसऱ्या लाटेनंतर राज्यातील रुग्णसंख्येत मोठी घट होत गेली. त्यामुळे सर्व निर्बंध हटवण्यात आले आणि राज्यातील सर्वच जनजीवन पूर्ववत झाले. मात्र, नुकत्याच आढळलेल्या ‘बीए.४’ आणि ‘बीए.५’ या प्रकारातील विषाणूंच्या संसर्गामुळे करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सरकारी वाहतूक सेवेतून प्रवास करताना, चित्रपटगृहांमध्ये, कार्यालयांत आणि रुग्णालयांमध्ये मुखपट्टी वापरण्याच्या सूचना डॉ. व्यास यांनी दिल्या आहेत. तसेच, रुग्णसंख्येतील चढउतारांवर लक्ष ठेवण्यासाठी ताप, सर्दी, खोकला, विषाणूजन्य आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या करोना चाचण्या करण्याचे आदेशही डॉ. व्यास यांनी दिले आहेत.

राज्यातील करोना चाचण्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. १ जूनच्या माहितीनुसार राज्यातील २६ जिल्ह्यांतील चाचण्यांची संख्या जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकापेक्षाही कमी झाली आहे. प्रति दहा लाख लोकसंख्येमागे एका आठवडय़ात किमान ९८० चाचण्या करणे आवश्यक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. एकूण चाचण्यांपैकी ६० टक्के चाचण्या आरटीपीसीआर असायला हव्यात. याबाबत दर आठवडय़ाला सर्व प्रयोगशाळा चालकांची बैठक घ्यावी. कोविड १९ संकेतस्थळावर माहिती भरली जावी. शीघ्र प्रतिपिंड चाचणी (रॅपिड अँटिजेन टेस्ट) सकारात्मक आलेल्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी केली जावी. ज्या प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये अतिशय कमी अथवा एकदम जास्त रुग्ण आढळत असतील, तर त्यावर नजर ठेवली जावी, अशा सूचना अतिरक्त आरोग्य सचिव डॉ. व्यास यांनी दिल्या आहेत.

राज्याच्या काही भागांत करोना विषाणूचे विविध प्रकार (व्हेरियंट) आढळले होते. या पार्श्वभूमीवर नवीन रुग्णांबाबत दर आठवडय़ाला विश्लेषण केले जावे. या आधारे स्थानिक पातळीवर उपाययोजना करणे शक्य होईल. नवीन रुग्ण आणि पुन्हा बाधित होणारे रुग्ण याबाबत विश्लेषण केले जावे, असे डॉ. व्यास यांनी सूचनांमध्ये नमूद केले आहे.

‘अद्याप मुखपट्टीसक्ती नाही’

राज्यात रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर मुखपट्टी वापराची सक्ती करण्यात आल्याचा समज आरोग्य खात्याच्या एका पत्रावरून झाला होता. मात्र अद्याप तरी सक्ती करण्यात आलेली नाही, पण गर्दी आणि बंदिस्त ठिकाणी मुखपट्टीचा वापर करावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

दक्षता काय?

’रेल्वे गाडय़ा आणि रेल्वे स्थानके, एसटी बस, नाटय़गृहे, चित्रपटगृहे, रुग्णालये, सभागृहे, शाळा-महाविद्यालये, हॉटेल्स आदी ठिकाणी मुखपट्टी वापरण्याच्या सूचना.

  • ताप, सर्दी, खोकला, विषाणूजन्य आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या त्वरित करोना चाचण्या करण्याचे आदेश.
  • रुग्णालयांसह अन्य संबंधित यंत्रणांमधील मनुष्यबळ, वाहतूक व्यवस्था, यंत्रसामग्री आदींबाबत खात्री करण्याचे निर्देश.
  • लसीकरण न झालेले नागरिक आणि सहव्याधीग्रस्त रुग्ण यांना गाफील न राहण्याचे आवाहन.
  • रुग्णसंख्येत लक्षणीय वाढीची शक्यता गृहीत धरून रुग्णालयांतील पायाभूत सुविधांचा आढावा. 

‘आगामी १५ दिवस महत्त्वाचे’ : पुढील १५ ते २० दिवस रुग्णसंख्येतील चढउतारावर लक्ष ठेवण्यात येईल आणि त्यानंतरच मुखपट्टी सक्तीबाबत निर्णय घेण्यात येईल. रुग्णसंख्येचा आलेख वाढू लागल्यास कृती दलाशी सल्लामसलत करून काही प्रमाणात निर्बंध पुन्हा लागू करावे लागतील, असे सूतोवाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

रुग्णवाढ नेमकी कुठे?

राज्यात सध्या पुणे, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर परिसरांत रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी सर्व रुग्णांना अत्यंत सौम्य लक्षणे आहेत. ते बरे होत आहेत, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

चाचण्या करा, लसीकरण वाढवा..

करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चाचण्यांची संख्या आणि लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून दिल्या आहेत.