मुंबई : राज्य सरकारी कर्मचारी संघाने जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी १४ मार्चपासून बेमुदत आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनामध्ये राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयातील परिचारिका, कक्षसेवक, सफाई कामगार सहभागी होणार आहेत. परिणामी, राज्यातील आरोग्य सेवा ठप्प होऊन रुग्णांचे हाल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राज्य सरकारी – निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना तात्काळ लागू करावी, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना तातडीने सेवेत कायम करावे, सर्व रिक्त पदे लवकरात लवकर भरावी यासह अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघाने १४ मार्चपासून बेमुदत आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनामध्ये राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना सहभागी होणार आहेत. या संपामध्ये रुग्णालयातील परिचारिका, कक्षसेवक, सफाई कामगार सहभागी होणार आहेत. त्यामुळे सर्व शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवा ठप्प होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबईतील राज्य सरकारच्या अखत्यारित असलेले जे.जे. रुग्णालय, सेंट जॉर्जेस रुग्णालय, जी.टी. रुग्णालय आणि कामा रुग्णालयातील सर्व तृतीय आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी या संपात सहभागी होणार असून, मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेण्यात येणार नाही. आमच्या मागण्यांचे निवेदन जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांना दिल्याची माहिती जे.जे. रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ राणे यांनी दिली.