मुंबई: मेट्रो ९ मार्गिकेतील कारशेडप्रकरणी उद्यापासून सुनावणी | Hearing in case of car shed in Metro 9 route from tomorrow mumbai print news amy 95 | Loksatta

मुंबई: मेट्रो ९ मार्गिकेतील कारशेडप्रकरणी उद्यापासून सुनावणी

दहिसर ते मीरारोड-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेतील राई-मुर्धा-मोर्वा येथील प्रस्तावित कारशेडला स्थानिकांनी विरोध केला असतानाही येथील ३२ हेक्टर जागेवर कारशेडसाठी आरक्षण प्रस्तावित आहे.

metro
( संग्रहित छायचित्र )

मीरा-भाईंदर पालिकेच्या मुख्यालयात ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान सुनावणी;राई-मुर्धा-मोर्वा येथे कारशेड करण्यास स्थानिकांचा विरोध

दहिसर ते मीरारोड-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेतील राई-मुर्धा-मोर्वा येथील प्रस्तावित कारशेडला स्थानिकांनी विरोध केला असतानाही येथील ३२ हेक्टर जागेवर कारशेडसाठी आरक्षण प्रस्तावित आहे. त्यावर नागरिकांनी मोठ्या संख्येने सूचना-हरकती सादर केल्या असून त्यावर मंगळवारपासून (आजपासून) सुनावणी होणार आहे. मिरारोड-भाईंदर महापालिकेच्या मुख्यालयात उद्यापासून तीन दिवस (३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी) ही सुनावणी होणार आहे. ही सुनावणी मेट्रो ९ प्रकल्पाच्या तसेच स्थानिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा >>>मुंबईत भाजपची मदार मोदींवरच

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो ९ मार्गिकेतील कारशेड भाईंदर येथील राई-मुर्धा-मोर्वा गावात बांधण्याचे प्रस्तावित आहे. या कारशेडमुळे अनेक घरे आणि शेती बाधित होणार असल्याचे कारण देऊन स्थानिकांनी या कारशेडला विरोध केला आहे. तसेच कारशेडसाठी इतर तीन जागांचे पर्यायही दिले आहेत. मात्र एमएमआरडीएने या विरोधाला न जुमानता प्रस्तावित जागेवरच कारशेड उभारण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे कारशेडचा वाद पेटला आहे. दरम्यान राज्य सरकारने पर्यायी जागेत कारशेड हलविण्याच्यादृष्टीने अभ्यास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एमएमआरडीएने अभ्यास केला आणि या जागी कारशेड उभारणे आर्थिक-तांत्रिकदृष्ट्या अव्यवहार्य असल्याचे म्हणत प्रस्तावित जागेतच कारशेड उभारण्याची भूमिका कायम ठेवली आहे. एमएमआरडीएच्या अभ्यासानंतरही सरकारने उत्तनमध्येच कारशेड होईल असे हिवाळी अधिवेशनात जाहीर केले आहे. मात्र एमएमआरडीएकडून याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या सर्व घडामोडींपूर्वी अर्थात सप्टेंबर २०२२ मध्ये नगर विकास विभागाने राई-मुर्धा-मोर्वा येथील ३२ हेक्टर जागा कारशेडसाठी आरक्षित करून यासंबंधीची सूचना प्रसिद्ध केली होती. त्यावर विहित मुदतीत ११७६ सूचना-हरकती सादर झाल्या आहेत. या सूचना-हरकतींवर नवी मुंबईतील कोकण भवन येथे ३० ते १ फेब्रुवारीदरम्यान सुनावणी ठेवण्यात आली. मात्र स्थानिकांनी इतक्या दूर सुनावणी घेण्यास विरोध केला. सर्व नागरिकांना नवी मुंबईला जाणे-येणे शक्य होणार नसल्याचे सांगून सुनावणी भाईंदरमध्ये घेण्याची मागणी करण्यात आली. ही मागणी मान्य करून सरकारने मीरा-भाईंदर पालिकेच्या मुख्यालयात सुनावणी ठेवली आहे. दरम्यान ३० जानेवारीला कोकण विभाग शिक्षण मतदार संघ द्विवार्षिक निवडणूक होणार आहे. त्यामुळे आजची सुनावणी रद्द करून आता ती २ फेब्रुवारीला ठेवली आहे.

हेही वाचा >>>“…हे तर थेट नरेंद्र मोदी व अमित शाह यांनाच आव्हान”, संजय राऊतांची खोचक टीका; म्हणाले…

सरकारने हिवाळी अधिवेशनात कारशेड उत्तनला हलविण्याचे जाहीर केले असले तरी अद्याप याबाबतचे आदेश एमएमआरडीएला देण्यात आलेले नाहीत. त्यातही घोषणा होण्याआधीच सरकारने सूचना-हरकती मागविल्या होत्या. त्यामुळे ही प्रकिया पूर्ण होणे आवश्यक आहे. आमचा कारशेडला विरोध आहे, होता आणि असणार आहे. तेव्हा ही भूमिका सुनावणी दरम्यान आम्ही ठामपणे मांडू. या सुनावणीचा अहवाल काय येतो आणि त्यावर सरकार काय निर्णय घेते यावर आमची पुढची भूमिका अवलंबून असेल. पण कोणत्याही परिस्थितीत आमच्या गावात कारशेड होऊ देणार नाही. तसाही शेवटचा न्यायालात जाण्याचा पर्याय आमच्याकडे आहे.-अशोक पाटील,भूमिपुत्र सामाजिक समन्वय संस्था (स्थानिकांची संस्था)

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 11:07 IST
Next Story
मुंबईत भाजपची मदार मोदींवरच