मुंबई : आजच्या वेगवान जीवनशैलीत तरुणांमध्ये हृदयविकाराच्या घटना चिंताजनकरीत्या वाढत असल्याचे दिसत आहे. अलीकडेच ३५ वर्षीय महिलेला आलेल्या हार्ट अटॅकच्या घटनेने डॉक्टरांनाही आश्चर्यचकित केले. कारण तिच्या हृदयाच्या धमन्यांमध्ये कोणताही ब्लॉकेज आढळला नाही. ही घटना केवळ एक अपवाद नसून तरुणांमध्ये वाढत चाललेल्या एका ‘सायलेंट क्रायसिस’कडे लक्ष वेधणारी आहे.

सामान्यतः हार्ट अटॅक म्हणजे हृदयाच्या धमन्यांमध्ये चरबी किंवा थक्के साचून रक्तप्रवाह अडथळित होणे, अशी समजूत असते. मात्र या प्रकरणात तसे काहीही नव्हते. डॉक्टरांनी याला मिनोका असे निदान दिले. या अवस्थेत हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य धमन्या स्वच्छ दिसतात तरीही हृदयाच्या स्नायूंना नुकसान होते.या प्रकारामागील कारणे अनेक असू शकतात.

काही वेळा रक्ताचे लहान थक्के तात्पुरते तयार होऊन नंतर विरघळतात, ज्यामुळे अँजिओग्राफीमध्ये ते दिसून येत नाहीत. काही रुग्णांमध्ये धमन्यांमध्ये अचानक आकुंचन (स्पॅझम) होतो, ज्यामुळे रक्तप्रवाह तात्पुरता थांबतो. याशिवाय शरीरातील इतर भागातून आलेले थक्के, हृदयाच्या स्नायूंमध्ये होणारी सूज (मायोकार्डायटिस), ताणामुळे होणारी ‘ताकोट्सुबो सिंड्रोम’ ही अवस्था किंवा लहान रक्तवाहिन्यांमधील बिघाडही यामागे कारणीभूत असू शकतो.

ही स्थिती ‘सायलेंट’ मानली जाते कारण ती सहज ओळखू येत नाही. अनेक वेळा रुग्ण पूर्णपणे फिट दिसतो, त्याला कोणतीही पूर्वलक्षणे नसतात आणि नियमित तपासण्या देखील सामान्य येतात. त्यामुळे धोका लक्षात येत नाही आणि अचानक गंभीर घटना घडते. विशेषतः लहान रक्तवाहिन्यांमधील बिघाड पारंपरिक चाचण्यांमध्ये दिसत नसल्याने निदान करणे अधिक कठीण होते.तज्ञांच्या मते, तरुणांमध्ये या प्रकारच्या हार्ट अटॅकचे प्रमाण वाढण्यामागे आधुनिक जीवनशैली मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे.

सततचा ताण, अपुरी झोप, अनियमित आहार, धूम्रपान आणि मद्यपान या सवयी हृदयावर विपरीत परिणाम करतात. त्याचबरोबर जिममध्ये अति व्यायाम करणे, स्टेरॉइड्स किंवा सप्लिमेंट्सचा चुकीचा वापर, तसेच मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारखे लपलेले आजारही धोका वाढवतात. ही घटना एक महत्त्वाचा संदेश देते तो म्हणजे हार्ट अटॅक म्हणजे नेहमीच ब्लॉकेज असतो, असे नाही. ‘रिपोर्ट नॉर्मल आहे’ याचा अर्थ धोका नाही, असे समजणे चुकीचे ठरू शकते. त्यामुळे तरुणांनीही आपल्या आरोग्याबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे.

जीवनशैलीत योग्य बदल, ताण नियंत्रण, नियमित व्यायाम आणि वेळोवेळी वैद्यकीय तपासणी यांद्वारे हा धोका काही प्रमाणात कमी करता येऊ शकतो. एकूणच बाहेरून निरोगी दिसणाऱ्या तरुणांमध्येही हृदयविकाराचा धोका लपलेला असू शकतो. त्यामुळे या ‘सायलेंट क्रायसिस’कडे दुर्लक्ष न करता वेळेवर जागरूकता आणि प्रतिबंधात्मक उपाय यांना प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे.