लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबई तसेच उपनगरांत उकाड्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. मुंबईतील तापमानात बुधवारी झालेली वाढ गुरुवारीही कायम होती. त्यामुळे नागरिकांना असह्य उकाडा सोसावा लागत आहे. तसेच गुरुवारी दुपारनंतर काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

आर्द्रतेमुळे घाम येऊन मुंबईकरांना बुधवारी त्रास झाला. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी ३७.६ तर, सांताक्रूझ केंद्रात ३७.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सध्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने, तसेच वारे खंडित झाल्याने हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच पावसाच्या शिडकाव्यामुळे तापमानात फारसा फरक पडणार नाही, असेही सूत्रांनी सांगितले.

आणखी वाचा-घाटकोपर दुर्घटना : तीन दिवसानंतर मदतकार्य स्थगित, १६ जणांचा मृत्यू

मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये उष्मा जाणवेल. तसेच ४०-५० किमी वेगाने वारे वाहतील आणि हलका पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. धुळे, नाशिक, जळगाव आणि सांगली, सातारा भागात गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.