लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : शहर तसेच उपनगरात पुढील काही दिवस तापमानात चढ-उतार होतील. तसेच आर्द्रता अधिक असल्यामुळे उष्मा मोठ्या प्रमाणात जाणवेल. मात्र, सध्या तीव्र उष्णतेची म्हणजेच ‘उष्णतेच्या लाटे’ची शक्यता नाही. त्यामुळे काही दिवस तरी माफक दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे. कमाल तापमान जरी कमी असले तरी वातावरणातील आर्द्रतेमुळे बैचेन होते. मुंबईतील तापमानात बुधवारी २ अंशांनी घट झाली. मात्र, दिवसभर उकाड्यामुळे मुंबईकर हैराण झाले होते. संपूर्ण दिवस उकाडा आणि मधूनच उन्हाचा चटका यामुळे पुन्हा उष्णतेची लाट येते की काय ही चिंता नागरिकांना सतावू लागली आहे. परंतु जरी या काही दिवसांत मुंबईत उष्मा वाढला, तापमानात वाढ झाली तरी उष्णतेच्या लाटेची शक्यता नसल्याचा अंदाज खासगी हवामान अंदाजकांनी व्यक्त केला आहे.

आर्द्रतेचा वैताग

सध्या मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे तापमानात घट झाल्यानंतरही उष्मा जाणवत आहे. मुंबई, तसेच उपनगरांत पुढील तीन – चार दिवस कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअस दरम्यान असेल. मात्र आर्द्रतेचे प्रमाण ८० ते ८५ टक्क्यांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. यामुळे विशेषत: सकाळी व सायंकाळी अधिक घालमेल होऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आर्द्रता ही बाहेरील वातावरणात साधारण ३० ते ७० टक्क्याच्या दरम्यान असते. ४५ ते ५५ टक्के ही सापेक्ष आर्द्रता बहुतांश लोकांसाठी सुखद मानली जाते. मात्र, मुंबईत ही आर्द्रता सध्या ७० टक्क्यांच्या पुढे आहे. त्यामुळे मुंबईचे दिवसभराचे तापमान जरी कमी असले तरी आर्द्रतेमुळे असह्य उष्मा सहन करावा लागत आहे.

कमी आर्द्रता असल्यास (३० टक्के खाली)

  • त्वचा कोरडी होते.
  • श्वास घेण्यास त्रास होतो.
  • डोळे, घसा कोरडे पडतात.

अति आर्द्रता असल्यास (७० टक्के पेक्षा जास्त)

  • शरीर उष्णतेचा निसर्गरित्या निचरा करू शकत नाही.
  • बुरशी, अॅलर्जी, दमटपणा वाढतो.
  • उष्णतेचा त्रास अधिक होतो.