उत्तरेच्या वाऱ्यातील अडथळ्यांमुळे थंडी लांबली
गेले दोन दिवस तापमानात झालेली घट आज-उद्याही जाणवणार असली तरीही ही थंडीची सुरुवात असल्याचे सांगण्यास हवामानतज्ज्ञ तयार नाहीत. मध्य भारतावर सध्या कमी दाबाचे क्षेत्र असल्याने वातावरणाच्या वरच्या पातळीत वारे चक्राकार गतीने फिरत आहेत. त्यामुळे उत्तरेकडून वारे थेट मुंबईपर्यंत पोहोचत नसून हे क्षेत्र निवळेपर्यंत शहर थंड होण्याची शक्यता नाही.
नोव्हेंबरच्या सुरुवातीला पूर्व तसेच ईशान्येकडून वारे येतात व नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ात ईशान्य आणि उत्तरेकडून वारे येण्यास सुरुवात होते. या वाऱ्यांसोबत उत्तरेकडील थंडीही मुंबईपर्यंत पोहोचते. मात्र नोव्हेंबर संपतानाही मुंबईकर उकाडय़ाने हैराण होताहेत. त्यातच समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळेही उकाडय़ात वाढ होत आहे. या सगळ्यासाठी मध्य भारतावरील कमी दाबाचे क्षेत्र कारणीभूत ठरले आहे. वातावरणाच्या वरच्या पातळीवर वारे चक्राकार गतीने फिरत असल्याने उत्तरेतील वारे दक्षिणेकडे थेट पोहोचण्यास प्रतिबंध येत आहे. या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. ही स्थिती निवळण्यास किमान दोन ते तीन दिवस लागणार आहेत.

शुक्रवारपासून तापमानात काही अंशी घट झाली आहे. शनिवारी कुलाबा येथे कमाल ३०.६ अंश से., तर सांताक्रूझ येथे ३२.३ अंश से. तापमानाची नोंद झाली. किमान तापमान २२.५ अंश से. आणि १९.२ अंश से. राहिले. रविवारी व सोमवारी सकाळीही किमान तापमान १८ ते १९ अंशांदरम्यान राहणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे.