राज्यातील इतर भागात तापमापकाने केव्हाच चाळिशी पार केली असतानाच मुंबईतील तापमान मात्र ३३ ते ३५ अंश सेल्सिअसच्या घरात आहे. मात्र, असे असले तरी उकाडय़ाने मुंबईकरांना त्राही त्राही करून सोडले आहे. हवेतील बाष्पात वाढ झाल्याने भर दुपारीही सापेक्ष आद्र्रतेचे प्रमाण ७० टक्क्य़ांहून अधिक वाढले आहे. या आद्र्रतेमुळे प्रत्यक्षातील तापमानाची तीव्रता दहा ते बारा अंश सेल्सिअसने वाढत असून तापमापकातील पारा ३३ अंश सेल्सिअसवर स्थिरावला असला तरी उकाडा मात्र ४५ अंश सेल्सिअसचा जाणवत आहे.
रविवारी सांताक्रूझ येथे कमाल ३३.५ अंश सेल्सिअस तर कुलाबा येथे ३१.३ अंश सेल्सिअस तापमान होते तर या दोन्ही ठिकाणी सायंकाळी पाच वाजता अनुक्रमे ७१ टक्के व ९१ टक्के सापेक्ष आद्र्रता नोंदवली गेली. डिसकम्फर्ट इंडेक्सच्या कोष्टकानुसार सांताक्रूझ व कुलाबा या दोन्ही ठिकाणी ४५ अंश सेल्सिअस एवढा उकाडा जाणवत होता. एप्रिलच्या अखेरच्या आठवडय़ात पश्चिमेकडील वाऱ्यांची दिशा नैऋत्येकडे सरकली असून या वाऱ्यांमध्ये बाष्पाचे प्रमाण अधिक असते. आता मे महिन्यात बाष्पाचे प्रमाण वाढत जाणार असल्याने उकाडाही वाढणार आहे. – डिसकम्फर्ट इंडेक्स म्हणजे काय?/ ३

राज्याच्या ग्रामीण भागात तापमान अधिक असले तरी तेथे हवा कोरडी असते. तेथील उच्च तापमानाने उष्माघाताचा धोका असतो. मुंबईत बाष्पामुळे तापमानावर नियंत्रण राहते मात्र त्याचवेळी हवेतील बाष्पाचे प्रमाण अधिक झाले की ‘डिसकम्फर्ट इंडेक्स’ वाढतो.
के. एस. होसाळीकर, उपमहासंचालक, हवामानशास्त्र विभाग, मुंबई</strong>