मुंबई : यंदा राज्यात अतिवृष्टी, पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३०० वर पोहोचली आहे. राज्यभरात १०० जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

२२ ते २४ जुलैदरम्यान कोकण आणि पश्चिाम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीतील बळींची संख्या आता २१३ वर पोहोचली असून, अजूनही ८ जणांचा शोध लागलेला नाही. ५२ जण जखमी आहेत. अतिवृष्टीमुळे कोकणातील १२०५ गावांना फटका बसला असून, तेथील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

गेल्या आठवड्यात कोकण आणि पश्चिाम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यास अतिवृष्टी तसेच पुराचा मोठा फटका बसला होता. त्यावेळी रायगड आणि सातारा जिल्ह्यात दरडी कोसळून ७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. सध्या या जिल्ह्यातील पाऊस कमी झाला असून, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरही ओसरू लागला आहे. सध्या पूरग्रस्त भागात मदतकार्य वेगात सुरू असून हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न होत असतानाच येत्या पाच दिवसांत पुन्हा याच भागांत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

राज्य आपत्ती निवारण नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यातीत अतिवृष्टीचा फटका दोन हजार ५५६ गावांना बसला आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हयातील ४११, सांगली १०४, सातारा ४१६, पुणे ४२०, रत्नागिरी ४८२, पालघर ३९६, रायगड २८५ गावांचा समावेश आहे.  दरडी कोसळून तसेच पुरामुळे २१३ लोकांचा मृत्यू झाला असून  ७४२ जनावरे आणि ६२ हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला. कोकणात आठ हजार २६७ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले असून, तीन हजार २७४ घरांचे नुकसान झाले आहे. पूरग्रस्त भागात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या १६ तुकड्या मदतकार्य करीत आहेत.

आजपासून मदतवाटप

पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून राज्य आपत्ती निधीतून १० हजार रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे. शुक्रवारपासून मदतवाटप होईल, असे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.