पाणीपुरवठा खंडित; पाणी उकळून प्यावे-पालिकेचे आवाहन

मुंबई : मुंबईत शनिवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका भांडुप जलशुद्धीकरण केंद्राला बसला. पावसाचे पाणी साचल्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी आणि उदंचन संयंत्रे बंद करावी लागली. परिणामी, मुंबईतील बहुतांश भागांत रविवारी पाणीपुरवठाच होऊ शकला नाही. शनिवारी रात्रीपासूनच पावसाच्या तांडवाने हवालदिल झालेल्या मुंबईकरांना पाणीपुरवठा खंडित झाल्याने रविवारी नव्या समस्येला सामोरे जावे लागले. दरम्यान, युद्धपातळीवर संकुलातील जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करून संध्याकाळी टप्प्याटप्प्याने मुंबईचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला. नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून प्यावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

मुंबईत कोसळलेल्या पावसाचे पाणी भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील गाळणी आणि उदंचन संयंत्रामध्ये शिरले. परिणामी, तांत्रिक समस्या निर्माण झाली. खबरदारीचा उपाय म्हणून तेथील विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला. परिणामी, मुंबईतील बहुतांश भागांमध्ये रविवारी पाणीपुरवठा होऊ शकला नाही. प्रामुख्याने शहर आणि पश्चिम उपनगरांमध्ये पाणीपुरवठा होऊ शकला नाही, तर पूर्व उपनगरांमधील पाणीपुरवठय़ावर अंशत: परिणाम झाल्याची माहिती जल विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

दक्षिण मुंबईसह अनेक भागांत भल्या पहाटे पालिके चे पाणीच न आल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक नागरिक नगरसेवक, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून पाणीपुरवठय़ाची चौकशी करीत होते. अखेर भांडुप संकु लातील समस्येची बातमी वाऱ्याच्या वेगाने मुंबईत पसरली; परंतु पाणीपुरवठा कधी होणार हे कळू न शकल्याने अनेक भागांतील नागरिकांना बाटलीबंद पाण्यावर तहान भागविणे भाग पडले.

जलशुद्धीकरण संकुलात साचलेले पावसाचे पाणी तातडीने उपसून गाळणी आणि उदंचन यंत्रणा परिसर स्वच्छ करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. त्याचबरोबर संबंधित संयंत्राची पाहणी  आणि आवश्यक त्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले. तसेच पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. उपायुक्त अजय राठोर यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी भांडुप जलशुद्धीकरण संकुल येथे उपस्थित होते.

संकुलातील पेयजल उदंचन यंत्रणा काही तासांतच पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. मात्र गाळणी यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी जास्त कालावधी लागू शकतो. त्यामुळे पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर मुंबईकरांनी पाणी उकळून प्यावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, संध्याकाळी काही भागांतील पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.