मुंबई, पुणे, ठाणे : मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागांत मंगळवारीही मुसळधार पाऊस कायम राहिला़   मुंबई आणि उपनगरांत झालेल्या अतिमुसळधार सरींची नोंद वेगवेगळय़ा भागात १४० ते १५० मिमी झाली. उसंत न घेता सलग दुसऱ्या दिवशी कोसळणाऱ्या पावसाने मुंबईतील अनेक भाग जलमय झाले. त्यामुळे अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली तर लोकल रेल्वे सुरू असली तरी वेळापत्रक कोलमडले होते. दरम्यान, पुढील दोन दिवस मुंबई आणि ठाण्यात पाऊस कायम राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहर आणि उपनगरांमध्ये सोमवारपासून अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. मुंबई शहर आणि उपनगरांतील वेगवेगळय़ा भागांत मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत, २४ तासांत १४० ते १५० मिमी पाऊस पडला.

मुंबई आणि ठाण्यातही जनजीवन विस्कळीत झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आदी भागांत जोरदार पाऊस होत आहे. विदर्भातही गेल्या चोवीस तासांत काही भागांत जोरदार सरी कोसळल्या. मराठवाडय़ात मात्र पावसाचे प्रमाण अद्यापही कमी आहे.

पावसात वीज पडून रत्नागिरी जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला असून ठाण्यात भिंत कोसळून दोन जण जखमी झाले आहेत.

अरबी समुद्रातून सध्या महाराष्ट्राच्या दिशेने मोठय़ा प्रमाणावर बाष्प येत आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीचा भाग आणि त्यालगत थेट पश्चिम महाराष्ट्रापर्यंत मोठय़ा प्रमाणातवर ढग निर्माण होत असल्याने दोन ते तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे.  रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे गेल्या २४ तासांत तब्बल ३४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

रायगडमध्ये सोमवारी दाणादाण उडविणाऱ्या पावसाचा जोर मंगळवारी कमी होता़ मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात वेगवान वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कायम होता़ जिल्ह्यात गेल्या २४ तासांत यंदाच्या मोसमातील उच्चांकी पावसाची (१५७ मिलीमीटर) नोंद झाली. जिल्ह्यातील जगबुडी (खेड) वाशिष्ठी (चिपळूण), शास्त्री (संगमेश्वर), अर्जुना आणि कोदवली (राजापूर) या नद्यांचे पाणी अधूनमधून इशारा पातळीला स्पर्श करत आहे. जगबुडीने तर सोमवारी धोक्याचीही पातळी गाठली होती. अर्जुना नदीवरील कालवा फुटल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट शनिवापर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

पाऊसस्थिती..

शहर आणि उपनगरांतील अनेक भागांत मंगळवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला. सकाळी साडेआठ वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंत भायखळा ८५.५ मिमी, चेंबूर १०६.५ मिमी, जुहू विमानतळ १४२.५ मिमी, विद्याविहार १५९ मिमी, सहार विमानतळ १४९.५ मिमी, वांद्रे १३८ मिमी, गोरेगाव १२५.५ मिमी, जुहू १२३ मिमी, पावसाची नोंद झाली. 

जलसाठय़ात भर..

जोरदार पावसामुळे मंगळवारी सकाळपर्यंत तलावांमध्ये सुमारे २० हजार ८५९  दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली. मुंबईला अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी तलाव क्षेत्रात सोमवारी दिवसभरात अनुक्रमे १४ मिमी, ५६ मिमी, ७८ मिमी, ३१ मिमी,  ६१ मिमी, ११९ मिमी व २२७ मिमी पाऊस पडला.  त्यामुळे जलसाठय़ात मोठय़ा प्रमाणावर भर पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पुढील चार दिवसांत..

मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस होणार आहे. ठाणे जिल्ह्याला ९ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दहिसर येथे दोघे बुडाले

मुंबई : दहिसर पूर्व येथील तलावात पोहण्यासाठी आलेल्या सात जणांपैकी दोघे बुडाले. त्यातील एकाचा मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलाला यश आले असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. कांदिवली येथील तरण तलावात पोहत असताना ७३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain in mumbai hit normal life thane on heavy rain alert zws
First published on: 06-07-2022 at 05:40 IST