लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: गेले अनेक दिवस राज्यात पावसाने विश्रांती घेतली. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी वगळता मोठा पाऊस झाला नाही. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबई शहर तसेच उपनगरांत पाऊस पडलेला नाही. दरम्यान, रविवारी सकाळी मात्र मुसळधार पावसाने अनेक भागात हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आणि उकाड्यापासून दिलासा मिळाला.




दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात पहाटेपासून अधून मधून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन – तीन दिवसांपासून मुंबईतील अनेक भागांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आणखी वाचा-महापालिका अधिकारी रमाकांत बिरादार यांची सात तास चौकशी; मृतदेह पिशव्या गैरव्यवहार प्रकरण
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात पश्चिमी वाऱ्यांचा वेग वाढल्याने कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मंगळवारपर्यंत राज्यात हलका पाऊस पडणार आहे. दरम्यान, शुक्रवारी कोकण, मराठवाडा तसेच विदर्भात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला.