ठाणे, मुंबई,पुणे : गेले दीड आठवडा विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी दुपारपासून मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे डोंबिवली आणि ठाणे शहरातील काही सखल भागांमध्ये पाणी साचले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.डोंबिवली शहरात सायंकाळी ७ वाजेपर्यंत १२३ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. या खालोखाल दिवा शहरात १०१ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. दरम्यान, राज्याच्या विविध भागांत पुढील चार ते पाच दिवस पावसाची हजेरी कायम राहणार आहे. मोसमी पावसाचा राज्यातील परतीचा प्रवास यंदाही नियोजित सर्वसाधारण वेळेपेक्षा उशिराने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>“आगामी निवडणुकीत मुंबईतील २४ हजार कष्टकरी…”, गुणरत्न सदावर्तेंची मुंबईत मोठी घोषणा

मुंबईतील पूर्व उपनगरात विक्रोळी, मुलुंड परिसरात सर्वाधिक पाऊस पडला. तर शहर भागात ग्रॅन्ट रोड परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली.
पावसाचा जोर वाढल्याने ठाण्यातील दुपारच्या सत्रातील काही शाळाही सोडण्यात आल्या. ठाणे आणि डोंबिवली शहरातील काही भागात पाणी देखील साचले होते. तर अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर मध्ये देखील मुसळधार पाऊस झाला.

कारण काय?
देशाच्या पश्चिमेकडील भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांचा परिणाम म्हणून राज्याच्या विविध भागात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या आंध्र प्रदेश ते गुजरातपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. ही प्रणाली महाराष्ट्रातून जात असल्याने विविध भागात पावसाची हजेरी आहे.

वाहतूक कोंडी
मुंबई नाशिक महामार्गावरील दिवे – अंजुर ते रांजणोली, जुन्या आग्रा मार्गावर कशेळी – काल्हेर, घोडबंदर मार्ग आणि शिळफाटा परिसरात वाहतूक कोंडी झाली.