Heavy Rain Alert in Maharashtra Today: राज्यात आजपासून मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे.भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार एकाच वेळी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व दक्षिण चीनच्या प्रशांत महासागर या तीन समुद्रात १७ ते २० डिग्री उत्तर अक्षवृत्तदरम्यान तीनही ठिकाणी तयार होणारे कमी दाब क्षेत्रे व त्यातून तयार होणारी चक्रीय वाऱ्यांची स्थिती आणि या तीनही ठिकाणी त्यांच्या उत्तरेकडे होणाऱ्या मार्गक्रमणामुळे वळिवाच्या गडगडाटी पावसाची शक्यता या आठवड्यात निर्माण झाली आहे. तसेच अरबी समुद्रातील गुजराथकडे तर बंगालच्या उपसागरातील ओरिसा छत्तीसगडकडे चक्रीय वाऱ्यांचे मार्गक्रमण होणार आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र व गुजराथ, ओरिसा आणि बंगाल येथे अवकाळी पावसाची शक्यता आहे.
मंगळवारपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र , मराठवाडा भागात गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. याचबरोबर उत्तर कोकणातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडेल. या कालावधीत ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.आठवडाभर पावसाचा मारा सुरु राहील. दरम्यान, आठवडाभर हा वळवाचा पाऊस सक्रीय राहील. विशेषतः सिंधुदुर्ग , रत्नागिरी, खानदेश ,नाशिक, पुणे सातारा , सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी , नांदेड या जिल्ह्यांत वळवाच्या पावसाचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या वातावरणामुळे राज्यात दिवसाचे कमाल तापमान, त्याचबरोबर पहाटेचे किमान तापमानही सरासरीपेक्षा कमी राहील
मुंबईत मुसळधार
मुंबईत बुधवारपासून(२१ मे) ते शनिवारपर्यंत (३१ मे) या दहा दिवसांत मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावेळी काही भागात जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे.
नेऋत्य मोसमी वारे अंदमान व निकोबार बेटांवर दाखल
भारतीय हवामान विभागाने नैऋत्य मोसमी वारे मंगळवारी अंदमान व निकोबार बेटांवर दाखल झाल्याचे जाहीर केले आहे. अंदमान निकोबार बेटावर मोसमी वारे दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख ही २० मे असून या वर्षी ते ८ दिवस आधीच दाखल झाले आहेत . तसेच केरळमध्ये मोसमी वारे दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख १ जून आहे. गोव्यात ५ जून आणि मुंबईमध्ये सर्वसाधारण १० जूनपर्यंत नैऋत्य मोसमी वारे दाखल होतात. मात्र यंदा केरळमध्ये २७ मेपर्यंत, गोव्यामध्ये १ जूनपर्यंत, तर महाराष्ट्रात मुंबई येथे ५ जूनपर्यंत मोसमी वारे दाखल होण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा व विदर्भात १० जूनपर्यंत मोसमी वारे दाखल होतील अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्यात या पावसामुळे केवळ पेरणीपूर्व शेतीच्या मशागतीचाच विचार करावा. कपाशी व टोमॅटो लागवडी करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी पाण्याची व्यवस्था असेल तरच लागवडीचा विचार करावा, अन्यथा लागवडीवर विपरीत परिणामही होण्याची शक्यता आहे. कारण मोसमी पाऊस अजूनही टप्प्यात नसून दूर आहे. कारण मोसमी पावसाच्या सरासरी तारखेचा विचार केल्यास, महाराष्ट्रात येण्यास अजून २५ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.