मुंबई : मुंबईसह ठाणे आणि आसपासच्या परिसरात सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत होता. पावसामुळे अनेक ठिकाणचे सखलभाग जलमय झाले. मुंबई उपनगरांत मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणचे रस्ते जलमय झाले. त्यामुळे रस्ते वाहतूक मंदावली होती. दरम्यान, मंगळवारी दिवसभर मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हेही वाचा.. मोठी बातमी! मनसेच्या नेत्यावर बलात्काराचा आरोप, मुंबई पोलिसांनी केली मोठी कारवाई

मुंबईत सोमवारी रात्रीपासून मंगळवारी पहाटेपर्यंत मुसळधार पाऊस पडला. दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, अंधेरी, सांताक्रुझ, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, चेंबूर, कुलाबा या भागात दमदार पाऊस झाला. या भागात मंगळवारी सकाळपासून हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे कही ठिकाणच्या सखलभागात पाणी साचले. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, पुणे, नाशिक, घाट भागात दिवसभर मधूनमधून तीव्र आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हेही वाचा… Sada Sarvankar: शिवसेना-शिंदे गटातील संघर्षानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, आमदार सदा सरवणकर यांचं पिस्तूल जप्त

मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत (गेल्या २४ तासात) सांताक्रूझ येथे ९३.४ मि.मी. आणि कुलाब्यात ५९.२ मि.मी. पावसाची नोंद झाली. तसेच, उल्हासनगर १२ मि.मी., ठाणे ३६ मि.मी., मुरबाड ८ मि.मी. भिवंडी २४ मि.मी., अंबरनाथ २० मि.मी. पावसाची नोंद झाली.