मुंबईकरांची चौपाटय़ांवर गर्दी; मैदानी खेळातही रंगत; वाहतुकीवर मात्र परिणाम

गेले काही दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील वातावरण आल्हाददायक बनले असून रविवारी सुट्टीच्या दिवशी अधूनमधून पडलेल्या पावसाच्या सरींमध्ये भिजण्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी तमाम मुंबईकरांनी चौपाटय़ा, गेट वे ऑफ इंडिया, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आदी ठिकाणी गर्दी केली. अनेक ठिकाणच्या मैदानावर तरुणाईने फुटबॉलचा खेळ रंगवत दिवस साजरा केला.

मुंबईमध्ये रविवारी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. सकाळी ते सायंकाळी ५ या वेळेत शहरात ८.२६ मि.मी., पूर्व उपनगरात १२.२६ मि.मी, तर पश्चिम उपनगरात १२.६० मि.मी. पावसाची नोंद झाली. सुट्टीचा दिवस असल्यामुळे अनेकांनी सकाळीच गिरगाव, मरिन ड्राइव्ह, वरळी, दादर, जुहू चौपाटीवर गर्दी केली होती. पावसाबरोबरच समुद्रकिनाऱ्यावर धडकणाऱ्या लाटांमध्ये भिजण्यासाठी गिरगाव, वरळी चौपाटीवर तरुणाई लोटली होती. वाफाळणाऱ्या चहासोबत कांदाभजीवर ताव मारण्यासाठी टपऱ्यांवर गर्दी दिसत होती. तर दुसरीकडे खरपूस भाजलेल्या मक्याच्या कणसाचा आस्वाद घेत पावसाचा मनमुराद आनंद लुटणारी तरुणाई ठिकठिकाणी दिसत होती. एरव्ही संगणक किंवा मोबाइलच्या विळख्यात अडकणारी तरुणाई पावसाच्या आकर्षणामुळे रविवारी मोठय़ा संख्येने मैदानात अवतरली होती.  तर सुट्टी आणि पावसामुळे फारशी रहदारी नसलेल्या गल्लीबोळांमध्ये काही ठिकाणी रस्त्यांवर लगोरीचा खेळ मांडला होता.

धरण क्षेत्रात पाऊस

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात शनिवारपासून जोरदार पाऊस सुरू  आहे. रविवारी सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत तानसामध्ये ८९.६० मि.मी., मोडक सागरमध्ये ६९.६० मि.मी., तर मध्य वैतरणामध्ये १३.०१० मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसाने धरणांमध्ये दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केल्यामुळे साठय़ामध्ये वाढ होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शनिवारी पवई तलाव ओसंडून वाहू लागला. त्यापाठोपाठ आता तुळशी तलावही भरून वाहण्याच्या मार्गावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दोन तरुणांचा बुडून मृत्यू

  • घाटकोपरच्या पूर्वेकडील गारडिया नगर, पेस्तम सागर रोड येथील खाडीत एक तरुणाचा, तर भांडुप (प.) येथील शिवाजी तलावामध्ये एका तरुणाचा बुडून रविवारी मृत्यू झाला.
  • मुसळधार पाऊस पडत असताना रविवारी दुपारी साडेतीन-पावणेचारच्या सुमारास किसन दगडू वाघमारे (३०) हा पेस्तम सागर रोडजवळ खाडीत बुडाला.
  • अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत किसन वाघमारे यांना खाडीतून बाहेर काढले. राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.
  • भांडुप (प.) येथील शिवाजी तलावात एक तरुण बुडाल्याचे समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तलावामध्ये बराच वेळ शोध घेतल्यानंतर एका तरुणाचा मृतदेह सापडला. चौकशी केली असता मृत तरुणाचे नाव राजेंद्र धामपाल गेचंद (२८) असल्याचे समजले.

वाहतूक संथगतीने

शुक्रवारपासून सुरू असलेली संततधार आणि रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे यामुळे रविवारी शहरात काही भागांत वाहतूक कोंडी झाली. मुंबई शहरातून उपनगरात जाणारे पश्चिम व पूर्व द्रुतगती मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि स्वामी विवेकानंद मार्ग पावसाच्या तडाख्याने खड्डेमय झाले असून, या मार्गावरील वाहतूक रविवारी मंदावली. विशेषत: सांयकाळी वरळी चौपाटी भागातील वाहतूक संथगतीने सुरू होती. यात टॅक्सी-रिक्षा मिळत नसल्याने प्रवाशांचे हाल झाले. सायंकाळी ५ ते रात्री १०.३० वाजेपर्यंत पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली.

उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, दहिसर या भागांत काही प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे रस्ते वाहतुकीला याचा फटका बसला. अनेक मार्ग निसरडे झाल्याने वाहन चालकही खबरदारी म्हणून वाहन कमी वेगाने चालवत होते. त्यामुळे सायंकाळी पश्चिम द्रुतगती मार्गावर गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि दहिसर भागांत वाहतूक कोंडी झाली होती. तसेच रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास वांद्रे-कुर्ला संकुल जंक्शन, लोअर परळ, एलफिन्स्टन पूल, अंधेरी-घाटकोपर रोड भागातही वाहतूक मंदावली होती.

भुशी धरणावर पर्यटकांची झुंबड

  • लोणावळ्यातील धुवांधार पावसाने पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेले भुशी धरण रविवारी पहाटे ‘ओव्हर फ्लो’ झाले.
  • धरणाच्या सांडव्यावरुन मोठया प्रमाणात पाणी वाहू लागले असून रविवारी या ठिकाणी पर्यटकांची एकच झुंबड उडाली.
  • यामुळे धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी तर झालीच, शिवाय पर्यटकांनी उभ्या केलेल्या वाहनांच्या लांबच- लांब रांगांमुळे पोलिसांना रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास हा रस्ता बंद करावा लागला.

कोकण रेल्वे विस्कळीत

कोकण रेल्वे मार्गावर मुंबईहून रत्नागिरीकडे येत असलेल्या मांडवी एक्सप्रेस गाडीवर रविवारी सकाळी वीर ते करंजाडी स्थानकांच्या दरम्यान वडाचे मोठे झाड उन्मळून पडल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. या वेळी गाडीचा वेग नियंत्रणात असल्यामुळे हानी झाली नाही.

***************************

सेल्फी काढताना ज्युदोपटूचा मृत्यू

धुळे : तालुक्यातील लळिंग कुरणात सेल्फी काढताना धबधब्याच्या पाण्यात पडल्याने उदयोन्मुख ज्युदोपटू रितेश सोनार (२०) याचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी ही घटना घडली.  रितेश हा मित्रांसमवेत मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या लळिंग कुरणात फिरण्यासाठी गेला होता. मित्र पोहत असताना रितेश मोबाइलमधून धबधब्याचे फोटो काढू लागला. त्यातच फोटो काढताना तोल े तो पाण्यात पडला.

*************************

जळगाव जिल्ह्य़ात चौघांचा बळी

जळगाव: जिल्ह्य़ात रविवारी दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने चौघांचा बळी घेतला असून चोपडा तालुक्यात पुरामध्ये मायलेकी वाहून गेल्या. तर चोपडा तालुक्यात रविवारी शहराजवळील खाणीमुळे निर्माण झालेल्या डोहात बुडून दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. चोपडा शहराजवळच गोरगावले रस्त्यालगत खाण आहे. या खाणीमुळे तयार झालेल्या डोहात दुपारी पाच मुले पोहण्यासाठी गेले. त्यापैकी गौरव भालेराव (१४) आणि राहुल भरत चौधरी (१०) हे दोघे बुडू लागताच इतरांनी आरडाओरड करण्यास सुरूवात केली. मदतकार्य सुरू होईपर्यंत दोघांचा मृत्यू झाला.