जनजीवन विस्कळीत!

एक्स्प्रेस गाडय़ांचे वेळापत्रकही कोलमडले

  • कुर्ला, चुनाभट्टी येथे साचलेल्या पाण्यामुळे सीएसएमटी ते ठाणे, वाशी उपनगरीय सेवा बंद
  • ग्रँट रोड स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरवर फांदी कोसळली
  • एक्स्प्रेस गाडय़ांचे वेळापत्रकही कोलमडले

शहर व उपनगरात गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला. कुर्ला ते सायन व चुनाभट्टी स्थानकांत रुळांवर साचलेल्या पाण्यामुळे मध्य रेल्वेवरील मुख्य मार्ग व हार्बरवरील लोकल सेवा ठप्पच झाली.

सीएसएमटी ते ठाणे व वाशी लोकल बंद ठेवल्याने प्रवाशांचे हाल झाले. त्यात ग्रॅण्ट रोड स्थानकात ओव्हरहेड वायरवर झाडाची फांदी पडल्याने पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली. मुंबईत ठिकठिकाणी पाण्यातून वाट काढताना बेस्ट चालकांची त्रेधा उडाली. त्यामुळे ४८ बस बंद पडल्या.

पावसाने शनिवारीही मुंबईला झोडपले.  सकाळी बदलापूर, कल्याण, विठ्ठलवाडी, ठाणे स्थानकांत रुळांवर पाणी साचले होते.  पावसाचा वाढलेला जोर आणि भरती यामुळे कुर्ला, सायन, चुनाभट्टी स्थानकांतही रुळांवर पाणी साचले पाण्याची पातळी वाढतच गेल्याने सीएसएमटीपर्यंत जाणाऱ्या मुख्य मार्ग व हार्बरवरील लोकल अत्यंत धिम्या गतीने पुढे सरकत होत्या.  पाण्याच्या पातळीतही वाढ झाल्याने अखेर मध्य रेल्वेने ठाणे ते सीएसएमटी आणि वाशी ते सीएसएमटीपर्यंत लोकल फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. कर्जत, कल्याणपासून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल ठाणे स्थानकापर्यंतच चालवून त्यानंतर रद्द केल्या जात होत्या.

एक्स्प्रेसवरही परिणाम

मुंबई भागांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे-मुंबई इंटरसिटी व इंद्रायणी एक्स्प्रेसही रद्द करण्यात आल्या. भुसावळ ते मुंबई पॅसेंजर नाशिक स्थानकापर्यंतच चालवण्यात आली, तर अन्य काही एक्स्प्रेस गाडय़ांच्या वेळेतही बदल केल्याने प्रवाशांचा प्रवास बराच लांबला. तर अचानक रद्द केल्या जाणाऱ्या गाडय़ांमुळे स्थानकात सामानासह आलेल्या प्रवाशांचे हाल झाले. कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावरील रविवारी नियोजित केलेला मेगा ब्लॉक रद्द केला आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत असेल. हार्बरवरील मेगा ब्लॉक मात्र नियोजित वेळेनुसार असेल.

विमान सेवा उशिराने

पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याने मुंबई विमानतळावरील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमान सेवांवरही परिणाम झाला. विमान उड्डाणे ही अर्धा तास उशिराने होत होती. हीच परिस्थिती विमानतळावर उतरणाऱ्या विमानांचीही होती.

टिळक नगर ते चेंबूर स्थानकांदरम्यान रुळांवर पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. ओव्हरहेड वायरचेही नुकसान झाल्याने हार्बरवरील लोकल सेवा विस्कळीत झाली. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Heavy rainfall in mumbai mpg 94