मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात सलग दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेड, चिपळूण, राजापूर, संगमेश्वर या भागात पूर आला आहे. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी नातुवाडी बोगद्याजवळ माती आणि झाडे रेल्वे रुळावर आल्याने, रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. अनेक रेल्वेगाड्या जागच्याजागी थांबल्या आहेत. त्यामुळे प्रवासी गेले अनेक तास गाड्यांमध्ये, स्थानकांवर अडकले आहेत. त्यांच्या सोयीसाठी एसटीच्या विशेष बसचा ताफा कोकण रेल्वेच्या स्थानकात उभा करण्यात आला आहे. कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला असून, पूर्व पावसाळी केलेली कामे पाण्यात वाहून गेल्याचे दिसते आहे. मुंबईवरून कोकणात जाणारी आणि कोकणातून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक रेल्वेगाड्या पूर्णतः रद्द करण्यात आहेत तर काही रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने विशेष बस सोडण्याची मागणी कोकण रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे. हेही वाचा.Swami Avimukteshwaranand : “उद्धव ठाकरे जोपर्यंत पुन्हा मुख्यमंत्री..”, शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद मातोश्रीच्या भेटीनंतर काय म्हणाले? मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गरीब रथ एक्स्प्रेसच्या सावंतवाडी येथे थांबलेल्या रेल्वे प्रवाशांकरिता १६ बसची मागणी कोकण रेल्वे प्रशासनातर्फे केली आहे. तर, मंगळुरू एक्स्प्रेसच्या कणकवली येथे थांबलेल्या रेल्वेतील प्रवाशांकरीता १७ बसची मागणी केली आहे. तसेच कुडाळ येथे मंगला एक्स्प्रेसच्या आणि वैभववाडी येथे मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या प्रवाशांसाठी विशेष बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हेही वाचा.मरीन ड्राईव्ह येथील समुद्रात तरूणीची आत्महत्या या सर्व बस मुंबई दिशेने जाणार असून सावंतवाडी, वेंगुर्ला, कणकवली, देवगड आगारातून विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे.कोकण रेल्वे दिवाणखवटी येथे बोगदयाजवळ दरड कोसळल्याने मांडवी एक्स्प्रेस आणि दिवा पॅसेंजरमधील प्रवाशांना मुंबईला सोडण्यासाठी रत्नागिरी स्थानकातून ४० बस, चिपळूण स्थानकातून १८ बस, खेड स्थानकातून १० बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.