मुंबई : गेले काही दिवस मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे यंदा पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झाला असून मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. सातही धरणांमध्ये एकूण ५०.७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी तो केवळ ८.५९ टक्के होता. जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात धरणे ५० टक्के भरल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. या सातही धरणांची पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी असून आता धरणांमध्ये ७ लाख ३४ हजार ५६३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे.
यंदा जूनमध्ये समाधानकारक पाऊस पडल्याने मुंबईकरांची पाणीचिंता मिटली आहे. यंदा उन्हाळ्यात धरणांतील पाणीसाठ्याने तळ गाठल्यामुळे मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी महानगरपालिकेने राज्य शासनाकडे राखीव पाणीसाठ्याची मागणी केली होती. शासनाने ही मागणी मंजूर केली होती.
झपाट्याने कमी होणाऱ्या पाणीसाठ्याची मुंबईकरांना चिंतेत टाकले होते. मात्र, जूनमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. सद्यस्थितीत धरणांतील पाणीसाठा ५०.७५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गतवर्षी हे प्रमाण ८.५९ टक्क्यांपर्यंत घसरले होते. सद्यस्थितीत ऊर्ध्व वैतारणातील पाणीसाठा ६६.३८ टक्क्यांवर पोहोचला आहे.
तसेच मोडकसागरमध्ये ६३.१७ टक्के, तानसामध्ये ५६ टक्के, मध्य वैतारणामध्ये ७० टक्के, भातासामध्ये ४२.१३ टक्के, विहारमध्ये ४३.८ टक्के आणि तुळशीमध्ये ४०.३२ टक्के इतका पाणीसाठा आहे. जुलै आणि ऑगस्ट हे सर्वाधिक पाऊस पडणारे महिने असल्यामुळे यंदा सातही धरणे लवकरच काठोकाठ भरण्याची शक्यता आहे.
पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)
- ४ जुलै २०२५ – ७,३४,५६२
- ४ जुलै २०२४ – १,२४,३४३
- ४ जुलै २०२३ – २,५५,६२२