वातावरणीय बदलांमुळे मुंबईत वादळी पाऊस

रविवारी पहाटेपर्यंत मुंबईत  २०० मिलीमीटरपेक्षाही अधिक पाऊस पडला, 

मुसळधार पावसाचा फटका हा वसई-विरार शहराला बसला आहे. विरारमधील जाधव पाडा येथील चाळीत पाणी शिरले होते.यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. यात अडकून पडलेल्या नागरिकांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली.

मुंबई : पावसाळ्यातील सर्वसामान्य स्थितीच्या तुलनेत निराळी  स्थिती निर्माण झाल्यामुळे गेले दोन दिवस मुंबईत वादळी पाऊस झाला. दिवसभरात  के वळ रिपरिप सुरू असली तरीही रात्रीपासून ते सकाळ होईपर्यंत ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. रविवारी पहाटेपर्यंत मुंबईत  २०० मिलीमीटरपेक्षाही अधिक पाऊस पडला,  हवामान विभागाने त्याबाबत पूर्वानुमान दिले नव्हते.सर्वसाधारण स्थितीत जून ते सप्टेंबरमध्ये १२ कमी दाबाचे पट्टे बंगालच्या उपसागरावर निर्माण होतात, पैकी ६ तीव्र प्रकारचे असतात. कमी दाबाचे पट्टे वाऱ्यांना स्वत:कडे खेचतात. त्यामुळे मुंबईवर पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वारे सक्रिय होतात व मुसळधार पाऊ स पडतो.  संपूर्ण जून महिन्यात कमी दाबाचा तीव्र पट्टा तयार झालेला नाही. परिणामी, मुंबईत के वळ सुमारे ३ किमी उंचीपर्यंतच वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहात आहेत. त्याच्या वरील भागात पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे वाहात आहेत, अशी अस्थिर स्थिती असल्याचे निरीक्षण इंग्लंडच्या रेडिंग विद्यापीठातील हवामान अभ्यासक अक्षय देवरस यांनी नोंदवले.

वाहने पुलावर : मिठी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले कपाडिया नगर, टॅक्सीमन वसाहत आदी भाग दर पावसाळ्यात पाण्याखाली जातात. शनिवारी झालेला मुसळधार पाऊसही त्यास अपवाद नव्हता. शनिवारी या वसाहतींमध्ये दोन ते तीन फू ट पाणी साचले. मात्र हे पाणी मिठी नदीऐवजी लालबहाद्दूर शात्री मार्गावरून वाहत आल्याचे स्थानिकांचे म्हणणे होते. पाणी साचू लागल्याने यातील टॅक्सीमन वसाहतीतील नागरिकांनी आपली वाहने मिठी नदीवरील उड्डाणपुलावर आणून उभी के ली.

साकीनाका परिसरात दरड कोसळली, एक जण जखमी

मुंबई : साकीनाका भागातील संघर्षनगर येथे डोंगरावरील दरड कोसळल्याची घटना घडली. त्यामध्ये संघर्षनगरमधील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या एका इमारतीला या दरडीचा भाग येऊन धडकल्याने हानी पोहचली. दुर्घटनेत एक जण जखमी झाला.

शनिवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरात ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या. चांदिवलीतील संघर्षनगर भागातही रहिवासी सोसायटीनजीक डोंगर आहे. काल झालेल्या मुसळधार पावसात या डोंगरावरील दरड पहाटे ३ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास कोसळली. त्यामध्ये मोठे दगड-धोंडे सुमारे १०० मीटर अंतरापर्यंत उडून येऊन एका रहिवासी इमारतीला धडकले. त्यामध्ये इमारतीच्या काही घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.

ही अतिवृष्टीच –  आयुक्त चहल

चेंबूरमध्ये दरड कोसळली त्या ठिकाणी पालिका आयुक्त इक्बाल सिंह यांनी सकाळी भेट दिली. त्या वेळी ते म्हणाले की, शनिवारी रात्रीपासून मुंबईत तीन तासांत अडीचशे मिमी पाऊस पडला म्हणजेच ताशी ८० मिमी पाऊस पडला. ही अतिवृष्टीच होती. त्यामुळे ही दुर्घटना घडली.

देवनार वसाहतीत घरांमध्ये पाणी

गोवंडीतील देवनार महापालिका वसाहतीतील बैठय़ा चाळींमध्ये शनिवारी मध्यरात्री पाणी शिरले. २६ जुलैच्या पुरात या वसाहतीत चार ते पाच फू ट पाणी साचून मनुष्यहानी झाली होती. या घटनेनंतर येथील बहुतांश बैठय़ा चाळींची जमिनीपासूनची उंची वाढविण्यात आली होती. मात्र शनिवारी रात्री ती उंची ओलांडून पाणी घराघरात शिरले.

पिण्याचे पाणी विकत घेण्याची मुंबईकरांवर वेळ

पालिकेकडून होणारा पाणीपुरवठा रविवारी खंडित झाल्याने अनेक घरांमध्ये विकतचे पाणी आणावे लागले. ज्या भागांमध्ये पाणी साठले होते, तिथल्या नागरिकांनी पाणी ओसरल्यावर घरातील गाळ काढण्यासाठी साठवलेले पाणी वापरले. काही भागांत दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे ती बंद होती. त्यामुळे हवाबंद पाण्याच्या बाटल्याही मिळू शकल्या नाहीत. सकाळचे १० वाजून गेले तरी पाणी आले नसल्याने शेवटी आम्ही विकतच्या बाटल्या आणून जेवण तयार केले,’ असे धारावीतील लक्ष्मी नाडार यांनी दिली.

राष्ट्रीय उद्यानात पूरस्थिती

मुंबई : रविवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पूरस्थिती निर्माण झाली. उद्यानातील कार्यालये व कर्मचाऱ्यांची सेवा निवासस्थाने येथे पाणी शिरले. तसेच रस्ते, पूल यांनाही हानी पोहोचली; मात्र जीवितहानी झाली नाही. रविवारी सकाळपर्यंत बोरिवली भागात २०० मिमीपेक्षाही अधिक पाऊस झाला. त्यामुळे  उद्यानाचा बराचसा भाग जलमय झाला होता. उद्यानाच्या कार्यालयांमध्ये आणि कर्मचाऱ्यांच्या सेवा निवासस्थानांमध्ये पाणी शिरले. ‘‘काही वर्षांपूर्वी उंच भागावर कार्यालये उभारण्यासाठी राज्य सरकारने निधी देऊ के ला होता. तत्कालीन संचालकांनी हा निधी सरकारला परत के ला. याउलट जनतेच्या पैशांतून १ कोटी रुपये के वळ एका विश्रामगृहाच्या नूतनीकरणासाठी खर्च के ले. सध्या या विश्रामगृहामध्ये दुरुस्तीचे मोठे काम निघाले आहे,’’ अशी माहिती कन्झव्‍‌र्हेशन अ‍ॅक्शन इंडियाचे कार्यकारी विश्वस्त देबी गोएंका यांनी दिली.  राष्ट्रीय उद्यानाचे संचालक मल्लिकार्जुन यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पडलेल्या मुसळधार पावसाने उद्यानातील रस्ते आणि पुलाचे नुकसान झाले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Heavy rains in mumbai due to climate change zws

Next Story
VIDEO : ‘धीरे धीरे’ गाणे तेही संस्कृतमध्ये ऐकलेत का तुम्ही?