मुंबई,ठाण्यात मुसळधार; लोकल विलंब,वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल 

मुंबईसह ठाणे जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी कोसळलेल्या जोरदार पावसाने शहरवासियांची त्रेधा उडवली.

Heavy rain
( प्रतिनिधिक छायाचित्र )

मुंबईसह ठाणे जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी कोसळलेल्या जोरदार पावसाने शहरवासियांची त्रेधा उडवली. अनेक भागांत पाणी साचले. लोकल गाडय़ांचा वेग मंदावून वेळापत्रक विस्कळीत झाले. मुंबई आणि ठाण्यातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. परिणामी, प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, येत्या २४ तासांत मुंबईसह ठाण्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात सोमवारी दुपापर्यंत पावसाची रिमझिम सुरू होती. दुपारनंतर मात्र जोरधारा कोसळू लागल्या. मुलुंड, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, शीव, जोगेश्वरी, बोरिवली, मालाड, अंधेरी, सांताक्रुझ, कुलाबा या भागांत पावसाचा जोर अधिक होता. सायंकाळी पावसाची तीव्रता आणखी वाढली. रस्ते, रेल्वे वाहतूक मंदावली आणि नोकरदारांना घर गाठण्यासाठी कसरत करावी लागली. सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुंबई शहरात २१ मिमी, पूर्व उपनगरात १७ मिमी, पश्चिम उपनगरात २५ मिमी पाऊस कोसळल्याची नोंद झाली. दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने लोकल रेल्वेचे वेळापत्रक  कोलमडले. धुवाधार पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याने मध्य रेल्वेवरील मोटरमनना लोकल चालवताना अडचण येत होती. परिणामी, लोकल २०-२५ मिनिटे विलंबाने धावू लागल्या. स्थानकांमध्ये मोठी गर्दी झाली. कुर्ला ते विद्याविहार, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, पनवेल ते कर्जत या पट्टयात काही प्रमाणात रुळांवर पाणीही साचले. त्यामुळे लोकलचा वेग कमी करण्यात आला. त्याचा फटका सीएसएमटी ते कल्याण, कर्जत, कसारा मार्गावरील लोकल गाडय़ांना बसला. असेच चित्र पश्चिम रेल्वेवरही होते. पावसामुळे मोटरमनला लोकलचा वेग कमी करावा लागला आणि चर्चगेट ते विरारदरम्यानची वाहतूकही उशिराने होऊ लागली. हार्बर आणि ठाणे ते वाशी, पनवेल ट्रान्स हार्बरवरील लोकल वेळापत्रकही काहीसे विस्कळीत होते.

ठाण्यातील अनेक भाग जलमय

ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरांसह ग्रामीण भागातही मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला. अनेक सखल भागांत पाणी साचले. ठाणे शहरात सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू होती तर, दुसरीकडे पावसाच्या जोरधारा बरसत होत्या. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात मात्र पावसाचा जोर कमी होता. ठाणे शहरातील तलावपाळी, वंदना सिनेमागृह, राम मारुती रोडसह जांभळी नाका बाजारपेठेतही पाणी साचले होते. कोपरी येथील अष्टविनायक चौक परिसरात आणि दिवा स्थानक परिसरात दोन वृक्ष उन्मळून पडले. मुंब्रा पश्चिम येथील दत्तवाडी चाळीची संरक्षक भिंत कोसळली. वंदना डेपोजवळील एसटी महामंडळाच्या ठाणे विभागीय कार्यालयाची संरक्षण भिंत बाजूच्या दोन घरांवर पडली. या दुघर्टनेत गोपाळ पांचाळ (५८) जखमी झाले. भिवंडी शहरात मानकोली पुलाखाली तसेच अंजूर चौकात मोठय़ाप्रमाणात पाणी साचले. यामुळे या मार्गावरील वाहतूक संथगतीने सुरू होती. या मार्गावर खड्डे असल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली भागात पाणी साचले होते.

ठाणे जिल्ह्यात जोर

ठाणे : शहरात सोमवारी जोरदार पाऊस कोसळला. अनेक ठिकाणी पाणी साचले. अनेक भागांत वाहतूक कोंडी झाल्यामुळे हैराण झाले. वंदना डेपोजवळील एसटी महामंडळाच्या ठाणे विभागीय कार्यालयाची संरक्षण भिंत कोसळून एकजण जखमी झाला, तर मुंब्रा पश्चिम येथील दत्तवाडी चाळीची संरक्षक भिंतही कोसळली. डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरांतही दिवसभर संततधार होती.

मुंबईतील पर्यटकाचा माणगावात मृत्यू

मुंबईहून माणगावमधील देवकुंड येथे सहलीसाठी गेलेल्या एका पर्यटकाचा कुंडलिका नदीत बुडून मृत्यू झाला़ दिनेश तुकाराम शिंदे असे त्याचे नाव आह़े मुंबईहून १७ पर्यटक देवकुंड येथे आले होत़े

पाऊसमान..

’येत्या २४ तासांत मुंबई

आणि ठाणे जिल्ह्य़ात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज.

’पालघर जिल्ह्य़ात बुधवारी अतिवृष्टीचा इशारा

’रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत मुसळधारांचा इशारा.

’पुणे, कोल्हापूर, सातारा आणि नाशिक जिल्ह्य़ात ८ जुलैपासून जोरदार पावसाची शक्यता.

घरांची पडझड : मुंबईत पाच ठिकाणी घरांची पडझड झाली. यापैकी शहरात तीन, पूर्व उपनगरात एक आणि पश्चिम उपनगरात एका घराची पडझड झाली. १४ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले आणि १४ ठिकाणी झाडे, फांद्या कोसळल्या.

कोकणात जनजीवन विस्कळीत

पुणे : संपूर्ण कोकण विभागात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असून काही भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे, रस्ते पाण्याखाली गेले आहेत. नद्या दुथडी भरून वाहत असून, महाड आणि चिपळूण या शहरांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण अधिक आहे. महाड शहरात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकडय़ा दाखल झाल्या आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Heavy rains in mumbai thane local delays traffic jams amy

Next Story
मोठय़ा घरांची सोडतीद्वारे विक्री ; म्हाडाच्या दुरुस्ती मंडळाकडील घरांबाबत निर्णय
फोटो गॅलरी