मुंबई : मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला. मुंबईतील हिंदमाता, किंग सर्कल, शीव, मिलन सब-वे, बोरिवली आदी सखलभागात पाणी साचले होते. पाऊस कमी झाल्यावर काही ठिकाणी पाण्याचा निचरा झाला. तर काही ठिकाणी पाण्याचा निचरा होत आहे. दरम्यान पाणी साचल्याने रस्ते वाहतूक मंदावली आहे. मुंबईत पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे.

मानखुर्द रेल्वे स्थानकाच्या पुलावरील दक्षिण वाहिनीवर वाहतूक मंदगतीने सुरू होती. तसेच वरळी वांद्रे सागरी सेतूच्या दक्षिणेकडील मार्गिकेबाहेर पाणी साचले होते. तसेच खार सब-वे येथेही पाणी साचल्यामुळे वाहतूक कासवगतीने सुरू होती. याशिवाय देवनार येथील नीलम जंक्शन, भोईवाडा परिसरातील सक्कर पंचायत चौक व किंग्ज सर्कल, कुर्ला येथील कमानी जंक्शन येथे अर्धा फुट पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांना अन्य रस्त्याने गाड्या वळवाव्या लागत होत्या. परिणामी काही भागात वाहतूक कोंडीचा फटका चालकांना सोसावा लागला.

मफतलाल जंक्शन परिसरातील दक्षिण वाहिनीवरील वाहतुकीलाही फटका बसला होता. वांद्रे-कुर्ला संकुल जोडरस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. माटुंगा येथील मंजेरजी जोशी चौकात दोन फुट पाणी साचले होते, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.