Heavy Rain Predicted in Mumbai मुंबई : राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून मुंबईत आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, पहाटेपासून शहर तसेच उपनगरांत सरींनी हजेरी लावली आहे.

मुंबईत आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर ठाणे, पालघर जिल्ह्यातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज पहाटेच बोरिवली, मालाड परिसरात मुसळधार पावसास सुरुवात झाली आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पहाटे ५ ते ७ वाजेपर्यंत मालवणीमध्ये (५९ मिमी), दिंडोशी (४९ मिमी), अंधेरी(४० मिमी), विलेपार्ले (३६ मिमी), जोगेश्वरी (३२ मिमी), कांदिवली (२५ मिमी), बोरिवली (२२ मिमी) तर सांताक्रूझमध्ये (२१ मिमी) पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा…मूक आंदोलनातून सरकारची कोंडी? बंदला मज्जाव केल्यानंतर मविआचा नवा पवित्रा

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने दडी मारली होती. परिणामी कमाल तापमानात वाढ होऊन असह्य उकाडा सहन करावा लागला. दरम्यान, महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे क्षेत्र उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत पसरले आहे. परिणामी, राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.