मुंबई : मुंबईतील दुचाकीस्वारांना आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या सहप्रवाशासाठीही हेल्मेट वापरणे सक्तीचे असून मुंबईत या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पंधरा दिवसांनी हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर आणि सहप्रवाशांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. दंडात्मक कारवाईबरोबरच तीन महिन्यांसाठी लायसन्स निलंबित केले जाणार आहे.

मुंबईत विनाहेल्मेट प्रवास करणारे दुचाकीस्वार सर्रास दिसतात. हेल्मेट वापरणारे सहप्रवासी तर बोटावर मोजण्याइतकेच आहेत. परिणामी, हेल्मेट नसल्याने अनेक दुचाकीस्वारांना आणि सहप्रवाशांना अपघातावेळी इजा झाल्या आहेत. याबाबत वाहतूक पोलिसांकडून दुचाकीस्वारांना वारंवार सतर्क केले जाते. मात्र, दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करण्याबाबत उदासीन असतात. कायद्यानुसारही चालक आणि सहप्रवाशानेही हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. मात्र, आता या नियमाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची तयारी केली आहे. हेल्मेट न घालताच दुचाकी चालवणाऱ्या चालकांवर तसेच सहप्रवाशाने हेल्मेट घातले नसल्यास त्यावरही कारवाई केली जाणार आहे. पंधरा दिवसांनंतर याची अंमलबजावणी सुरू करण्यात येईल, अशी माहिती बृहन्मुंबई वाहतूक मुख्यालयाचे पोलीस उप आयुक्त राज तिलक रौशन यांनी दिली.

नियम काय?

दुचाकीस्वार आणि पाठीमागे बसलेल्या सहप्रवासी विना हेल्मेट असल्यास वाहन कायदा १९८८ कलम १२९ सह १९४ (ड) अन्वये बंधनकारक आहे. विना हेल्मेट दुचाकी चालविल्यास कायद्यानुसार ५०० रुपये दंड तसेच तीन महिन्यांसाठी चालक अनुज्ञाप्ती (लायसन्स) निलंबित करण्याची तरतूद आहे.