मुंबई : पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मांजामध्ये अडकून जखमी होणाऱ्या पक्ष्यांच्या मदतीसाठी ‘रेस्क्यूइंक असोसिएशन फॉर वेल्फेअर’ (रॉ) संस्थेतर्फे स्वतंत्र मदत क्रमांक (हेल्पलाइन क्रमांक) सुरू केली आहे. पक्ष्यांच्या बचाव कार्यासाठी एक रुग्णवाहिका, पशुवैद्यकीय डॉक्टर आणि स्वयंसेवकांचे पथक सज्ज करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मकरसंक्रांतीनिमित्त मंगळवार, १४ जानेवारी रोजी सर्वत्र पतंग उडवण्यात येतात. अनेक ठिकाणी पतंग उडवण्याची स्पर्धाही आयोजित करण्यात येते. दरवर्षी पतंग उडविण्याचा आनंद लुटत असताना  मांजामुळे अनेक पक्षी जखमी होतात. यामध्ये काहींचा मृत्यूही होतो. मांजामुळे कापल्याने होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढत आहे.  दरवर्षी अनेक कबुतरे, कावळे, घुबड, पोपट, घार आणि फुलपाखरे आदी त्यात बळी पडतात. या पार्श्वभूमीवर ‘रॉ’ संस्थेने बचावकार्य मोहीम हाती घेतली आहे. पतंगाचा मोह आवरावा व मांज्यामुळे जखमी पक्षी निदर्शनास आल्यास त्याला तात्काळ मदत करावी, तसेच जखमी पक्षी दिसल्यास ‘रॉ’ या स्वयंसेवी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सण साजरा करताना त्याचा दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे आहे, अशी विनंती पक्षीप्रेमी व स्वयंसेवी संस्थांनी केली आहे. त्यामुळे जखमी पक्षी आढळल्यास संस्थेच्या मदत क्रमांक ७६६६६८०२०२ वर संपर्क साधावा, अशी विनंती संस्थेतर्फे करण्यात आली केली.

हेही वाचा >>>मुदतठेवींमध्ये १० हजार कोटींची घट; पालिकेचा राखीव निधी ९१ हजार कोटींवरून ८१ हजार कोटींवर

चिनी आणि नायलॉन निर्मिती, विक्री, साठवण, खरेदी आणि वापर यावर कायद्याने बंदी आहे. तरीदेखील या मांजाचा वापर होत आहे. यामुळे दरवर्षी अनेक पक्ष्यांना गंभीर दुखापत होते. जखमी पक्षी दिसल्यास त्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे-पवन शर्मा, अध्यक्ष, रेस्क्यूइंक असोसिएशन फॉर वेल्फेअर

जखमी पक्षी दिसल्यास काय करावे?

पक्षी सुरक्षित, कमी आवाजाच्या ठिकाणी ठेवावा.

पक्ष्याभोवती गुरफटलेला मांजा जोरात ओढून काढू नये.

 पक्षाला जास्त हाताळू नये.

खाणे किंवा पाणी प्यायला देणे टाळावे.

मदतीस विलंब करू नये.