मूळव्याधामुळे त्रस्त असलेल्या टॅक्सी चालकाचा जीव धोक्यात घातल्या प्रकरणी ३० वर्षीय एमबीबीएस डॉक्टरला मंगळवारी अटक करण्यात आली. आंध्र प्रदेशमधील विद्यापीठातून २०१७ मध्ये एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्याचा दावा करणाऱ्या मुकेश कोटाने गेल्या तीन वर्षांत किमान एक हजार रुग्णांवर अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. कोटा तीन वर्षांपासून दादरमध्ये गोपाळ राव पाइल्स आणि एनो-रेक्टल सेंटर नावाचे क्लिनिक चालवित होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे (एमएमसी) अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणताही एमबीबीएस डॉक्टर पदव्युत्तर पदवी न घेता शस्त्रक्रिया करू शकत नाही.

“टॅक्सी चालक खलीलुद्दीन खतीब (४३) यांना कोटाचा नंबर त्यांना इंटरनेटवरून मिळाला आणि २० फेब्रुवारीला त्याच्या क्लिनिकला भेट दिली होती. दुसर्‍याच दिवशी पुन्हा त्याला बोलविण्यात आले आणि की त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर शस्त्रक्रिया करण्याची संमती असलेली एक फॉर्म भरून घेतला. कोटा यांनी शस्त्रक्रिया केल्यानंतर २५,००० रुपये घेतले,” असे माटुंगा पोलीस स्टेशनमधील एका अधिकाऱ्याने सांगितले.

घरी जात असताना, खतीब यांना रक्तस्राव होण्यास सुरवात झाली आणि टॅक्सीमध्ये ते बेशुद्ध झाले. त्यानंतर त्याला तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. रुग्णालयातून सोडण्यात आल्यानंतर खतीब यांनी ५ मार्च रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली.

तपासासाठी तज्ञसमितीची नेमणूक

माटुंगा पोलिसांनी तक्रारीनंतर शस्त्रक्रियेसंदर्भात तसेच डॉक्टर कोटा यांच्या पदवी संदर्भातील कागदपत्रे महाराष्ट्र वैद्यकीय परिषद तसेच वैद्यकीय अधिष्ठाता, जे. जे. रुग्णालय, मुंबई यांच्याकडे पाठवली. जे. जे. रुग्णालयामध्ये याबाबत तज्ञसमिती गठीत करण्यात आली. या समितीने २१ जून रोजी आपला अहवाल पोलिसांना सादर केला. एमबीबीएस डॉक्टर मूळव्याध संबंधित आजारावर शस्त्रक्रिया करू शकत नाहीत. मुळव्याधावर शस्त्रक्रिया करण्याकरिता डॉक्टरने एम. एस. सर्जरी ही अतिरिक्त शैक्षणिक अहर्ता धारण करणे आवश्यक आहे असे अधिकाऱ्यांनी सांगतले. डॉक्टर कोटा यांनी निष्काळजीपणा, हलगर्जीपणा केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.

त्यानंतर, कलम ३३७ (इतरांच्या जीवनामुळे किंवा इतरांची वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणे), ४१९ (व्यक्तिरेखाद्वारे फसवणूक) आणि ४२० (फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक नितीन मानसिंग बोबडे यांनी कोटाच्या अटकेची पुष्टी केली. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.