scorecardresearch

मुंबई: जेईई मुख्य परीक्षेचे नियम अन्यायकारक कसे? उच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना विचारणा

अभियांत्रिकी प्रवेशासाठी जानेवारी महिन्यात होणारी जेईई मुख्य परीक्षेचे नियम विद्यार्थ्यांवर अन्यायकारक कसे?

मुंबई: जेईई मुख्य परीक्षेचे नियम अन्यायकारक कसे? उच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना विचारणा
प्रातिनिधिक छायाचित्र

अभियांत्रिकी प्रवेशासाठी जानेवारी महिन्यात होणारी जेईई मुख्य परीक्षेचे नियम विद्यार्थ्यांवर अन्यायकारक कसे? ते अन्यायकारक असल्याचे याचिकाकर्त्यांना का वाटते? अशी विचारणा उच्च न्यायालयाने बुधवारी याचिकाकर्त्यांना केली. तसेच आम्हाला हे नियम अन्यायकारक कसे हे पाहायचे आहे? असे स्पष्ट करून ज्या नियमांना आव्हान देण्यात आले ते याचिकेसह जोडण्यात न आल्याबाबतही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.न्यायालयाच्या नाराजीनंतर याचिकाकर्तीने प्रकरणाची सुनावणी सोमवापर्यंत तहकूब करण्याची मागणी केली. तसेच त्यावेळी परीक्षेबाबतचे नियम सादर करण्यात येतील, असेही याचिकाकर्तीने म्हटले.

दुसरीकडे ७५ टक्के गुणांचा पात्रता निकष हा परीक्षेसाठी नाही, तर आयआयटी प्रवेशासाठी असल्याचे केंद्रीय परीक्षा संस्थेतर्फे (एनटीए) प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि संदीप मारणे यांच्या न्यायालयाला सांगण्यात आले. तसेच याचिकाकर्ते या मुद्दय़ाबाबत दिशाभूल करीत असल्याचा दावाही करण्यात आला.

परीक्षा पुढे ढकलण्याच्या आणि ७५ टक्के गुणांचा पात्रता निकष शिथिल करण्याच्या मागणीसाठी वकील अनुभा श्रीवास्तव सहाय यांनी ही याचिका केली आहे. जेईई मुख्य परीक्षा घेण्याबाबत आणि परीक्षेच्या पात्रता निकषाबाबत केंद्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) १५ डिसेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेला याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे.

या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. त्यावेळी परीक्षेच्या तारखांमुळे याचिकाकर्तीचे कसे नुकसान होणार आहे? तिची मुलगी किंवा मुलगा या परीक्षेला बसणार आहे का? असा प्रश्न न्यायालयाने केला. त्यावर आपला मुलगा किंवा मुलगी या परीक्षेला बसणार नाहीत, परंतु परीक्षेची तारीख चार महिन्यांपूर्वी जाहीर केली जाते. यावेळी ती शेवटच्या क्षणाला करण्यात आली. तसेच परीक्षेसाठी बारावीत ७५ टक्के गुणांचा पात्रता निकष यापूर्वी नव्हता, असेही याचिककर्तीने न्यायालयाला सांगितले. मात्र आव्हान देण्यात आलेल्या परीक्षा नियमांची प्रत याचिकेसह जोडण्यात न आल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तर एनटीएने गुणांच्या पात्रता निकषाबाबतचा याचिककर्तीचा दावा दिशाभूल करणारा असल्याचे न्यायालयाला सांगितले.

नेमके म्हणणे काय?
या परीक्षेची घोषणा शेवटच्या क्षणी करण्यात आली आहे. ही परीक्षा ज्या कालावधीत घेण्यात येणार आहे, त्याचवेळी बारावीच्या विविध राज्य व अन्य परीक्षा मंडळांच्या पूर्वपरीक्षा होणार आहेत. बहुतांश राज्य मंडळांनी जानेवारीमध्ये त्यांच्या पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षांचे वेळापत्रक आखले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आयआयटी जेईई मुख्य परीक्षा देणे शक्य होणार नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-01-2023 at 03:12 IST

संबंधित बातम्या