नगर जिल्ह्य़ातील भंडारदरा व मुळा आणि नाशिक जिल्ह्य़ांतील गंगापूर, दारणा या धरणांमधून मराठवाडय़ातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. मराठवाडय़ातील दुष्काळी भागांना पिण्यासाठी पाणी मिळावे याकरिता नाशिक व अहमदनगर जिल्ह्य़ांतील धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने (जीएमआयडीसी) घेतला होता. पण या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी अशी याचिका करत स्थानिक नेत्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. अखेर आज मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलेल्या अंतिम सुनावणीत जायवाडीत पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे नाशिक, नगरमधील धरणांतून जायकवाडीसाठी १२.८४ टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्थात, किती पाणी सोडायचे, नक्की गरज किती आहे याबाबत राज्याच्या जलसंपदा महामंडळाची पूर्वपरवानगी घेऊनच अशा प्रकारचा निर्णय घ्यावा असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. तर, याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची भूमिका घेतली आहे.