मुंबई : शहरी नक्षलवादाच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेले सागर गोरखे आणि रमेश गायकवाड या दोघांना उच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. या प्रकरणी काही आरोपींना न्यायालयाने आधीच जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे या आरोपींनाही समानतेच्या आधारावर जामीन मंजूर केला जात असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
या प्रकरणातील इतर अनेक आरोपींना दीर्घकाळ तुरुंगवासात असल्याच्या आणि नजीकच्या भविष्यात खटला सुरू होण्याची शक्यता नसल्याच्या कारणास्तव जामीन मंजूर करण्यात आला आहे, असेही न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नमूद केले. त्यामुळे, समानतेच्या आधारावर गोरखे आणि गायकवाड यांना देखील जामिनावर सोडण्यात यावे, असे न्यायालयाने म्हटले. त्यानुसार, या दोघांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा जामीन मुचलका सादर करण्याचे आणि महिन्यातून एकदा राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) कार्यालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
गोरखे आणि गायकवाड या दोघांना सप्टेंबर २०२० मध्ये अटक करण्यात आली होती आणि ते सध्या तळोजा कारागृहात आहेत. त्यांच्यावर बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) गटाचे सक्रिय सदस्य असल्याचा आरोप आहे. एल्गार परिषद प्रकरणात, बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) गटाचा उद्देश पुढे नेल्याच्या आरोपावरून प्रमुख वकील, कार्यकर्ते आणि शिक्षतज्ज्ञांसह १६ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच, सुरेंद्र गडलिंग वगळता इतर सर्व आरोपींना आता जामीन मंजूर झाला आहे.
तर, ८४ वर्षीय धर्मगुरू आणि आदिवासी हक्क कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांचा जुलै २०२१ मध्ये खटला सुरू होण्याच्या आणि जामीन मिळण्याच्या प्रतीक्षेत वाट पाहत असताना कोठडीत मृत्यू झाला.
या प्रकरणातील इतर आरोपींमध्ये वरवरा राव, सुधा भारद्वाज, आनंद तेलतुंबडे, व्हर्नन गोन्साल्विस, अरुण फरेरा, शोमा सेन, गौतम नवलखा, सुधीर ढवळे, रोना विल्सन, ज्योती जगताप आणि महेश राऊत यांचा समावेश आहे.
