मुंबई : सोळा वर्षांपूर्वी, २०१० मध्ये एका महानगरपालिका शाळेतील शिक्षकावर हल्ला केल्याप्रकरणी आणि त्यांच्यावर शाई फेकल्याप्रकरणी तत्कालीन भारतीय विद्यार्थी सेनेशी संबंधित १२ जणांना सत्र न्यायालयाने सोमवारी सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
शिक्षण देणाऱ्या शिक्षकांवर हल्ला करणे हा गंभीर गुन्हा आहे आणि या प्रकरणात मवाळ भूमिका घेतल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल, असे निरीक्षण अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. एम. जयसिंगानी यांनी या १२ जणांना दंगल घडवणे, घुसखोरी करणे आणि शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या लोकसेवकांवर हल्ला करणे या आरोपांखाली दोषी ठरवताना नोंदवले. त्याचवेळी, बेकायदेशीरपणे डांबून ठेवणे आणि धमकावल्याच्या आरोपांतून न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली.
ही घटना २० ऑगस्ट २०१० रोजी मुलंड महानगरपालिका माध्यमिक शाळेत घडली होती. सरकारी पक्षाच्या आरोपांनुसार, विजय पंढरी गवई याने स्वतःची ओळख ””विभागीय समन्वयक”” अशी सांगून एका जमावाला प्रभारी मुख्याध्यापकांच्या कक्षात नेले. तिथे त्यांनी शिक्षक प्रकाश बापू साळगर यांना नववीतील एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याच्या आरोपाप्रकरणी जाब विचारला. नंतर, त्यांना शिवीगाळ केली, त्यांच्या उजव्या हातावर काठीने प्रहार केला आणि एका बाटलीतील काळा रंग त्यांच्या चेहऱ्यावर व अंगावर फासला. प्रभारी मुख्याध्यापकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, हल्लेखोरांनी त्यांना बाजूला ढकलले आणि कार्यालयात तोडफोड केली; त्यांनी खिडकीची काच फोडली व फर्निचरचे नुकसान केले आणि त्यानंतर तिथून पळ काढला.
आरोपींची कृती अक्षम्य
आरोपींनी शाळेतील शिक्षकाच्या चेहऱ्यावर काळी शाई फेकण्याचे किंवा फासण्याचे धाडस केले, त्यांची ही कृती अक्षम्य आहे. शिक्षक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतात आणि विद्यार्थ्यांना शिक्षण देतात. शिक्षक त्यांचे कर्तव्य बजावत असताना त्यांच्याविरुद्ध असा गुन्हा करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. तसेच, १२ आरोपींना सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावून त्यांना प्रत्येकी पाचशे रुपयांच्या दंडही आकारला.
