मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका आपल्याच नियमांचे पालन करण्यात वारंवार अपयशी ठरत असल्याबद्दल उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. तसेच, गेल्या पाच वर्षांत मुंबईत किती बेकायदा बांधकामे आणि गॅरेज नियमित केली याचा सर्वसमावेशक तपशील सादर करण्याचे आदेश दिले.

महानगरपालिका अनेक प्रकरणांमध्ये नियम आणि कायद्याचे पालन करत नाही, अशा चुकांमुळे अनावश्यक न्यायालयीन प्रकरणे दाखल केली जातात. त्यासाठी सार्वजनिक निधी खर्च होतो. त्यामुळे, याकडे उच्च अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता असल्याची टिप्पणीही न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठाने केली.

गॅरेजचा व्यावसायिक कार्यालय म्हणून वापर करणाऱ्या रमेश दत्तात्रय पाठक यांनी या प्रकरणी याचिका केली होती. त्यात, इमारतीच्या पुनर्विकासाचा विचार करताना महापालिकेने गॅरेजच्या क्षेत्राला मान्यता देण्यास नकार दिल्याचा दावा पाठक यांनी केला होता. तथापि, गॅरेजचा वापर आपण कार्यालयासाठी करत होते. त्यामुळे पुनर्विकसित इमारतीतही आपण कायमस्वरूपी पर्यायी निवास मिळण्यासाठी पात्र असल्याचा दावा पाठक यांनी केला होता. या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने महापालिकेवर नियमांचे पालन करण्यात वारंवार होणाऱ्या अपयशाबाबत ताशेरे ओढले.

गॅरेजचे क्षेत्र मूळतः वाहनतळासाठी असले तरी, त्याचा व्यावसायिक वापर केला जात होता आणि बृहन्मुंबईसाठीच्या २०३४ च्या विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीच्या (डीसीपीआर नियम ३३(७) अंतर्गत पुनर्विकास योजनेत त्याचा समावेश करणे आवश्यक होते, असा दावाही याचिकाकर्त्यातर्फे सुनावणीच्या वेळी करण्यात आला. तथापि, पाठक यांच्याकडून गॅरेजचा बेकायदेशीररीत्या व्यावसायिक वापर केला जात होता, असे नमूद करून ९ डिसेंबर रोजी महापालितेच्या कार्यकारी अभियंत्यांनी (इमारत प्रस्ताव) त्यांचा अर्ज फेटाळून लावला.

पाठक यांनी पुनर्विकासापूर्वी नियमितीकरणासाठी अर्ज न केल्याबद्दल त्यांना दोष दिला. त्याचप्रमाणे, दंड भरून कोणत्याही पूर्वलक्ष्यी मंजुरीची किंवा नियमितीकरणाची शक्यता नाकारली. त्यावर, मुंबईतील पूर्वीच्या काळातील अनेक जुन्या इमारतींमध्ये गॅरेज होते. त्यांचा नंतर इतर कारणांसाठी वापर केला गेला. महापालिकेने अशीच सुसंगत भूमिका स्वीकारली, तर भविष्यातील पुनर्विकास प्रकल्पांतील वाद टाळता येतील, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. पुनर्विकासाच्या प्रक्रियेदरम्यान, इमारत पाडल्यानंतर, याचिकाकर्त्याने संबंधित वेळी नियमितीकरणासाठी अर्ज केला नव्हता. या कारणास्तव याचिकाकर्त्यावर जबाबदारी टाकणे, ही कार्यकारी अभियंत्याची कृती सकृतदर्शनी न्याय्य नाही.

महानगरपालिका आयुक्तांनीही या वस्तुस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, असे ताशेरे न्यायालयाने ओढले. तसेच, आपल्यासमोर दुसरा कोणताही पर्याय नाही, असे सांगून न्यायालयाने सक्षम अधिकाऱ्याला गेल्या पाच वर्षांत मुंबईतील किती गॅरेजचे नियमितीकरण केले आणि याच कालावधीत महानगरपालिकेने नियमित केलेल्या सर्व बेकायदेशीर बांधकामांचा तपशीलही देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.