लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : ‘ईद मिलाद उन – नबी’निमित्त राज्यात अनेक ठिकाणी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत डीजे आणि प्रखर दिव्यांच्या (लेझर बीम) वापरावर बंदीची मागणी करणारी जनहित याचिका तातडीने ऐकण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला.

पुढील आठवड्यात सोमवारी ईद – ए – मिलाद साजरा होणार आहे. त्यामुळे, या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी याचिकाकर्त्यांतर्फे न्यायालयाकडे करण्यात आली. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) गणेशोत्सव काळात डीजे आणि लेझर बीम वापरण्यावर बंदी घातली असल्याचेही याचिकाकर्त्यांनी तातडीच्या सुनावणीची मागणी करताना न्यायालयाला सांगितले. त्यावर, याचिकाकर्त्यांनीही आपल्या मागणीसाठी हरित लवादाकडे दाद मागण्याची सूचना मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना केली. त्यानंतरही, याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याचा आग्रह याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला. त्यास न्यायालयाने नकार दिला. तसेच, याचिका अद्ययावत पद्धतीने सुनावणीसाठी येईल. त्यावेळी, ती ऐकली जाईल, असे स्पष्ट केले.

हेही वाचा >>>गोरेगाव येथे दुचाकीला बसची धडक; एकाचा मृत्यू

दरम्यान, इस्लाममध्ये पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस ईद मिलाद उन – नब म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने घरे आणि धार्मिक ठिकाणे आकर्षक रोषणाईने सजवली जातात व मिरवणुका काढल्या जातात. मात्र, मागील काही वर्षांपासून या मिरवणुकांमध्ये डीजे आणि प्रखर दिव्यांचा सर्रास वापर करण्यात येतो. या मिरवणुकीत तरूण डीजेच्या ठेक्यावर बेधुंद होऊन नाचताना दिसतात. तसेच, काही ठिकाणी मिरवणुकीत मद्य आणि अमलीपदार्थंचाही वापर होत असल्याचा संशय पुणेस्थित काही मुस्लिम बांधवांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका करून उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे, हा सगळा प्रकार मुस्लिम धर्माची शिकवण, तत्वे आणि विचारांच्या विरोधात असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. आपला ईद साजरी करण्यास आणि मिरवणूक काढण्यास विरोध नाही. परंतु, ती साजरी करण्याच्या पद्धतीवर आक्षेप असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>>मेट्रो ३ वापरण्यासाठी ६० टक्के मुंबईकर उत्सुक; अर्थ ग्लोबलचा अहवाल

पुण्यासह मुंबईतील भेंडी बाजार परिसरातही अशाच प्रकारे डीजे आणि प्रखर दिव्यांचा वापर केला जातो. डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होऊन अनेकांना श्रवणाच्या व ह्रद्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. तर, प्रखर दिव्यांच्या वापरामुळे अनेकांनी दृष्टी गमावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर येत्या १६ आणि १७ सप्टेंबर रोजी ‘ईद मिलाद उन – नबी’च्या दिवशी डीजे आणि लेझरच्या वापरावर बंदी आणावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.